दरोडा घालणारा जेरबंद,15 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

0
12

गोंदिया,दि.23–  शहरात झालेल्या घरफोडीतील आरोपीला शहर पोलिस व गुन्हे प्रकटीकरणाच्या पथकाने ताब्यात घेतले. आरोपीच्या घर झडतीतून चोरी केलेल्या 15 लाख 33 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले.साहील उर्फ माट्या राजू आंबेकर (24) रा. विठ्ठल मंदिर वार्ड, निंबाळकर वाडी, चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला आज न्यायालयत हजर करून 26 मार्चपर्यंत पोलिस कोठडी घेतली असल्याची माहिती अपर पोलिस नित्यानंद झा यांनी आज, 22 मार्च रोजी शहर पोलिस ठाणे येथे माध्यम प्रतिनिधींना दिली.

शहरातील वर्दळीच्या सिव्हिल लाईन परिसरात 9 मार्च रोजी साहीलने मो. जाफर मो. आमीन कुंडरेवाला यांच्या घरी चोरी करून 55 तोळे सोन्याचे दागिण्यांसह रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. दरम्यान शहर पोलिस ठाणेचे ठाणेदार चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरिक्षक सोमनाथ कदम व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळ व सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपीचा शोध घेणे कठीण असताना गोपनिय माहिती व तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. विशेष म्हणजे यावेळी 200 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजचा पोलिसांनी तपास केला. तपासात आरोपी साहिल हा खूनाच्या गुन्ह्यात वर्धा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली. 20 मार्चपर्यंत त्याला पोलिस कोठडी होती. कोठडी संपताच 21 मार्च रोजी गोंदिया पोलिसांनी साहीलला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली. यावेळी त्याने चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्या घराची झडती घेत चोरीतील 15 लाख 33 हजार रुपयाचे दागिने हस्तगत केले. आज 22 रोजी साहिलला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता 26 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती झा यांनी दिली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर, पोलिस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश लबडे, सहायक पोलिस निरिक्षक सोमनाथ कदम उपस्थित होते.

आरोपी साहीलवर खूनासह 25 गुन्हे दाखल

आरोपी साहिलावर चंद्रपूर जिल्ह्यात खून, घरफोडीसह विविध तब्बल 25 गंभीर गुन्हे दाखल आहेत. 12 मार्च रोजी चंद्रपूर रेल्वे स्थानकात एका तरुणाची साहीलने हत्या केली होती. या गुन्ह्यात त्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली होती.