मतदान अधिकाऱ्यांनी जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडावे – उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे

0
10

अर्जुनी मोरगाव –-19 एप्रिल 2024 ला होऊ घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व मतदान अधिकाऱ्यांनी योग्यरीत्या आपले प्रशिक्षण पूर्ण करून निवडणुकीचे कार्य अत्यंत जबाबदारीने पार पाडावे असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वरूणकुमार सहारे यांनी केले.
11 -भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात म्हणजे 19 एप्रिलला निवडणूक होणार असल्याने मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण प्रसंगी वरुणकुमार सहारे बोलत होते.
हे प्रशिक्षण चार टप्प्यांमध्ये पूर्ण झाले असून यात अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी आणि गोरेगाव तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. 22 आणि 23 मार्चला साधारण 1 हजार 600 कर्मचाऱ्यांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले.
अर्जुनी मोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात प्रशिक्षण आणि एस.एस. जायस्वाल महाविद्यालयात प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण master trainer यांच्या कडून देण्यात आले. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
या प्रसंगी व्यासपीठावर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे, अर्जुनी मोरगाव चे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे हे उपस्थित होते.
प्रशिक्षण देताना वरुणकुमार सहारे यांनी, मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निःपक्षपाती पार पाडण्याकरिता आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज असून आपल्या प्रबळ सहकार्यानेच ही प्रक्रिया पूर्ण होत असते. हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. ही प्रक्रिया गांभीर्याने घेऊन कुठेही निष्काळजीपणा येणार नाही याकरिता आपण सर्वस्वी जबाबदारीने आपले कार्य पूर्ण करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या सोबतच आवश्यक सर्व महत्त्वपूर्ण बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला.