छत्तीसगड सीमेवर पोलीस-नक्षल चकमक

0
15

डचिरोली : छत्तीसगड सीमेवरील कांकेरच्या जंगलात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये २७ मार्च रोजी रात्री जोरदार चकमक उडाली. पोलिसांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे नक्षलवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याचे नक्षल्यांचे मनसुबे दुसऱ्यांदा उधळून लावले गेले.

छत्तीसगडच्या औंधीसह एटापल्ली तालुक्यातील कसनसूर, धानोरा तालुक्यातील चातगाव दलमचे नक्षलवादी महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील कांकेरच्या जंगलात तळ ठोकून असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याच्या तयारीत होते. यासंदर्भात पोलिसांना गोपनीय माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या भागात अपर अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली नक्षलविरोधी अभियान गतिमान केले. राज्य राखीव दलाच्या ८ तुकड्या, सी-६० चे जवान व एक शीघ्रकृती दलामार्फत परसिरात सर्च ऑपरेशन राबविले. यावेळी दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला.रात्री तीनवेळा पोलीस व नक्षलवाद्यांत धूमश्चक्री झाल्या. सुरुवातीला सायंकाळी ६ वाजता, त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता व २८ रोजी पहाटे साडेचार वाजता चकमक उडाली. पोलिसांनी जशास तसे उत्तर दिल्याने नक्षाल्यांना अखेर माघार घ्यावी लागली. घटनास्थळाहून वायर्स, जिलेटिनच्या काठ्या, बॅटऱ्या, सोलर पॅनल इत्यादी जप्त करण्यात आल्या. या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान करण्यात आले आहे.