रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, उमेदवाराचे जात प्रमाणपत्र अवैध

0
12

नागपूर: रामटेक या अनुसूचित जातीसाठी राखीव लोकसभा मतदारसंघांतील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला जबर धक्का बसला आहे.बर्वे या नागपूर जिल्हा परिषदेच्या अडिच वर्ष अध्यक्ष होत्या. त्याकाळात एकदाही त्यांच्या जात प्रमाणपत्रांचा मुद्दा उपस्थित झाला नव्हता.पण लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्यावर त्यांच्या जात प्रमाणपत्रांचा मुद्दा त्यांच्या राजकीय विरोधकांनी पुढे केला. सरकारी यंत्रणेने त्याची दखल घेतली. मात्र न्यायालयाने स्थगिती दिल्याने प्रकरण थंडावले होते. पण नंतर पुन्हा नव्याने एक तक्रार सामाजिक न्याय विभागाकडे करण्यात आली. त्याची तातडीने चौकशी करावी असे आदेश सचिवांनी जात वैधता प्रमाणपत्र तपासणी समितीला दिले.दरम्यान बर्वे या रामटेकमधून तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात म्हणून त्यांना काँग्रेसचे उमेदवारी दिली. बुधवारी सकाळी त्यांनी अर्ज दाखल केला होता. दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरूवारी त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्वाळा समितीने दिला. यामुळे बर्वे यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. त्यामुळे कॉंग्रेस या मतदारसंघात कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बर्वे या न्यायालयात दाद मागणार आहे. त्यांचे पती श्याम बर्वे यांनी डमी अर्ज दाखल केला आहे.