कारमध्ये कोंबून प्रेयसीच्या भावाचे अपहरण

0
8

नागपूर : बहिणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्याने चार साथीदारांच्या मदतीने युवतीच्या भावाचे कारमध्ये कोंबून अपहरण केले. त्याला मध्यप्रदेशात नेऊन ठार करण्याचा कट आखण्यात आला. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे अपहृत युवकाचा जीव वाचला. मुकेश गौतम भारती (२२, रा. थलोई, मछलीशहर-मध्यप्रदेश) असे मुख्य आरोपीचे नाव आहे.

पीडित युवक हा एमआयडीसीतील ट्रॅक्टर कंपनीत नोकरी करतो. त्याची बहीण मछलीशहर (म.प्र.) येथे आईवडिलांसह राहते. ती आरोपी मुकेश भारतीच्या सेतू केंद्रावर कागदपत्रे बनवायला गेली होती. दरम्यान, मुकेशने तिचा भ्रमणध्वनी क्रमांक घेतला. तरुणीला तो नेहमी फोन करीत होता. त्यामुळे दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र, त्यांच्या संबंधाची कुणकुण तरुणीच्या वडिलांना लागली. त्यांनी मुकेशला चांगला चोप दिला आणि पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतरही तो तरुणीला फोन करीत असल्याने नागपुरात नोकरी करणाऱ्या भावाने तिला नागपुरात आणले. काही दिवसानंतर मुकेश नागपुरातही पोहचला आणि तरुणीच्या संपर्कात आला. तरुणीच्या भावाने त्याला येथेही मारहाण करून पिटाळून लावले. मैत्रिणीचे वडील आणि भावाने मारहाण केल्याने त्याला अपमानित झाल्यासारखे वाटले. त्यामुळे त्याने मैत्रिणीच्या भावाचा खून करण्याचा कट रचला.

मुकेश भारती चार साथीदांरासह १७ एप्रिलला नागपुरात आला. त्याने मैत्रिणीच्या भावाला चाकूच्या धाकावर कारमध्ये कोंबले. कार थेट मध्यप्रदेशच्या दिशेने निघाली. आरोपींनी कारमध्येच त्याला मारहाण केली. अपहरण झालेल्या तरुणाच्या पत्नीने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार प्रवीण काळे यांनी गांभीर्य ओळखून थेट मध्यप्रदेश पोलिसांशी संपर्क साधला. अपहृत युवकाच्या मोबाईलचे लोकेशन घेऊन पाठलाग सुरू केला. पोलिसांनी कारचा पाठलाग करणे सुरू केले. यादरम्यान, पोलिसांनी त्याला फोन केला. आरोपींनी दिशाभूल करण्यासाठी त्याच्या गळ्याला चाकू लावून नागपुरात जरीपटक्यात असल्याचे सांगायला लावले. मात्र, पोलिसांनी त्यावर विश्वास न ठेवता पाठलाग सुरू ठेवला. त्यामुळे आरोपींची भंबेरी उडाली. एका ढाब्यावर अपहृत तरुणाला फेकून दिले आणि तेथून ते पळून गेले. पोलिसांनी त्या ढाब्यावरून युवकाला ताब्यात घेऊन कुटुबीयांकडे सोपवले.