अल्पवयीन मुलीचे अपहरणः अत्याचार करून हत्या

0
45

 लोकशाहीचा महोत्सव साजरा होत असताना गोंदिया जिल्हा हादरला

देवरी तालुक्यातील गोठाणपार येथील दुर्दैवी घटना…

देवरी,दि.२०- देशात लोकशाहीचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आज (दि.२०) रोजी समोर आल्याने संपूर्ण समाजमन हळहळले आहे. तालुक्यातील ककोडी क्षेत्रात असलेल्या ग्रामपंचायत गोठाणपार येथे काल (दि.१९) रोजी लग्नकार्यात आलेल्या एका १२ वर्षीय चिमुकल्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर अमाणूस अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने केवळ देवरी तालुकाच नव्हे तर अवघा गोंदिया जिल्हा हादरला असून आरोपीला अतिशिघ्र फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी समोर आली आहे

सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, मौजा गोठाणपार येथे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भसबोळन येथील नरेश तितराम यांचा मुलगा राकेश उर्फ रॉकी व देवरी तालुक्यातील गोठाणपार येथील कुरूसिंग पडोटी यांची मुलगी हेमलता उर्फ लता यांचे   काल १९ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता लग्न आयोजित करण्यात आले होते. या लग्न सोहळ्याला आलेल्या सहाव्या वर्गात शिकत असलेली पिडीत अल्पवयीन बारा वर्षीय मुलगी आलेली होती. त्याचवेळी अंधाराचा फायदा घेवून नराधमांनी त्या चिमूकलीचे अपहरण करून गावाशेजारी असणाऱ्या जंगलात अत्याचार केला. यानंतर तिच्या डोक्यावर जबर मारहाण करून हत्या केल्याची विदारक घटना समोर आली आहे.

लग्न कार्यात व्यस्त असलेल्या  पिडीतेच्या पालकांना जेव्हा मुलगी लग्नस्थळी आढळली नाही, तेव्हा तिच्या पालकांनी घावत सर्वत्र शोधाशोध केली. मात्र  कोठेही तिचा पत्ता लागला नाही. शेवटी गावकरी आणि इतर नातेवाइकांच्या मदतीने त्या मुलीचा शेजारच्या गावातही शोध घेण्यात आला. मात्र, त्याच फायदा झाला नाही. सध्या मोहफुलांचा हंगाम असल्यामुळे धवलखेडी या गावातील गावकरी  गावशेजारील जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेले असता तेथे अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला. या घटनेची माहीती प्रत्यक्षदर्शींनी चिचगड पोलिसांना दिली. यावरून प्रकरणा उघडकीस आले. सदर घटनास्थळ हे धवलखेडी गावापासून २ किमी तर गोठणपारपासून ३ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड पोलिसांनी हस्तगत केला असून श्वानपथकाचा तपास कार्यात मदत घेणार असल्याची माहिती आहे.

घडलेल्या घटना क्रमावरून ही घटना सामूहिकरीत्या करण्यात आल्याचे प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास येत आहे. घटनेचा तपास चिचगडचे ठाणेदार तांडेल यांचे नेतृत्वात चिचगड पोलिस करत असून वृत्त लिहिपर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती. या घटनेने संपूर्ण समाजपन सुन्न् झाले असून लोकांच्या भावना तीव्र आहेत. या घटनेतील नराधमांना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा करावी, अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.