गडचिरोलीत १११ वर्षांच्या आजीचे केले मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

0
6

गडचिरोली :- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली – चिमूर मतदारसंघाचा समावेश असून शुक्रवारी १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली होती. लोकशाहीच्या उत्सवात सर्वजण सहभागी झाले होते. मतदानासाठी मतदार घराबाहेर पडताना दिसत होते. अशात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत एका १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले.

फुलमती बिनोद सरकार (वय १११) असे त्या आजींचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. फुलमती सरकार यांचा जन्म १ जानेवारी १९१३ रोजी झाला. आजी तब्बल १११ वर्षांच्या असल्याने त्यांना चालता येत नव्हतं आणि ऐकू सुद्धा येत नव्हतं. आधारासाठी आपल्या नातवाच्या बरोबरीने दुचाकीवर बसून त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन स्वतः मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला. आजींच्या मतदानाचा उत्साह कौतुकास्पद होता. तर मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या तरुण वर्गासाठी १११ वर्षांच्या आजींचा हा उत्साह आदर्शवत होता.

भारत निवडणूक आयोगाने यंदा पहिल्यांदाच ८५ वर्षावरील मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार १० ते ११ एप्रिल या कालावधीत गृह मतदान प्रक्रिया सुद्धा राबविण्यात आली. मात्र काही मतदारांनी प्रत्यक्ष केंद्रावरच मतदान करण्याचा निर्णय घेतला. ते मतदार आज प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. त्यात फुलमती बिनोद सरकार या आजींचा देखील समावेश होता.

लोकशाहीच्या उत्सवात तब्बल १११ वय असलेल्या या आजींनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन मतदान करणे ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी गृह मतदान नाकारून लोकशाहीच्या उत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेतला. आजींना मतदान केंद्रापर्यंत व्हील चेअरने आणण्यात आलं होतं. यावेळी त्यांना त्यांच्या नातवंडांनी, गावातील नागरिक आणि महसुलचे कर्मचाऱ्यांनी मदत केली.

कोरोना काळात लसीकरणातही आजीने घेतलेला पुढाकार

फुलमती सरकार यांनी १८ जानेवारी २०२२ रोजी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये देखील गोविंदपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले होते. त्या त्या १०९ वर्षांच्या होत्या. त्यावेळी त्यांनी युवा पिढीला मतदानासाठी पुढे येण्याचं आवाहन देखील केलं होतं. एवढंच काय तर देशावर कोरोना महामारीचा संकट असताना सुरुवातीला गडचिरोली जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिकांचा विरोध होता. या आजींनी लसीकरणातही पुढाकार घेऊन स्वतः लस घेत लसीकरणासाठी सर्वांनी पुढे यावे असंही आवाहन केलं होतं.