गोठणपार हत्याकांडातील चारही आरोपी अल्पवयीन मुलांची बाल सुुधारगृहात रवानगी

0
53

सामूहिक अत्याचार करून केली बालिकेची हत्या

गोंदिया,दि.२७ः- जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील गोठणपार येथे लग्न समारंभात आलेल्या 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्यानंतर हत्या केल्याप्रकरणी देवरी तालुक्यातीलच चिल्हाटी गावातील ४ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेत नागपूर येथील बाल सुधारगृहात रवानगी केल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांनी पत्रपरिषदेत दिली.कुठलेही सबळ पुरावे नसल्याने आरोपींचा शोध घेतांना अडचणी निर्माण झालेल्या होत्या,अशा परिस्थितीत पोलिसांनी मोठ्या शिताफीने या घटनेचा तपास करून आश्रमशाळेतील इयत्ता १२ वीत असलेल्या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

१९ एप्रिलला पीडित मुलगी आपल्या बहिणी सोबत देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोठणपार गावात लग्न समारंभात आली होती.पीडित मुलीच्या मित्राने तिला आपल्या दुचाकीवर बसवून वडेकसा जंगलात घेऊन गेला. तिथे असलेल्या 4 मित्रांनी पीडितेवर जंगलात सामूहिक अत्याचार करून दगडाने डोक्यावर वार करीत हत्या करीत पळ काढला.२० एप्रिलला सकाळी पीडितेच्या शोध घेतला असता गावकऱ्यांना पीडित मुलीचा मृतदेह जंगलात मोहफुल वेचायला गेलेल्याना आढळला.पोलिसांना याची माहिती देण्यात आली.सदर घटनास्थळी मोबाईल नेटवर्क सुद्धा नसल्याने पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यात अडचण निर्माण होत असल्याने पोलिसांनी ६ विविध पथके तयार करून या संदर्भात तपास केला असता पीडितेच्या मोबाईल वरून काही मुलांशी चॅटींग समजून आल्याने आणि हत्येचा वेळ सारखा असल्याने पोलिसानी तपास चक्रे फिरवीत 4 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत चौकशी केली.त्यातील 2 मुलांनी गुन्हा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कलम 302, 376, 363, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या चारही विधिसंघर्ष बालकांची रवानगी नागपुर येथील बाल सुधारगृहात करण्यात आल्याची माहिती दिली.