नागपुरात छत्तीसगडमधील बुकींच्या टोळ्या; लकडगंज पोलिसांची कारवाई

0
4

नागपूर : इंडियन प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेतील अर्धेअधिक सामने खेळल्या गेल्यामुळे आता सर्वोत्कृष्ट क्रिकेट संघावर क्रिकेट बुकी लाखोंमध्ये सट्टेबाजी खेळत आहेत. राज्याचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या नागपुरात सट्टेबाजीसाठी छत्तीसगढमधील क्रिकेट बुकींच्या टोळ्या येत आहेत. लकडगंज पोलिसांनी एका टोळीवर छापा घालून १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गेल्या १५ दिवसांपासून छत्तीसगढमधील क्रिकेट बुकींची टोळी नागपुरात आली होती. आयपीएलच्या सामन्यांवर लाखोंमध्ये लगवाडी-खायवाडी सुरू होती. टोळीने नागपुरात येताच एका मोठ्या हॉटेलमध्ये अनेक खोल्या बुक केल्या होत्या. या हॉटेलमधूनच सट्टेबाजीचे रॅकेट संपूर्ण महाराष्ट्रभर चालविल्या जात होते. लकडगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार वैभव जाधव यांना माहिती मिळताच सतनामीतील बी.टी.पी. हॉटेल येथे कारवाई केली.

पोलिसांनी तेथील ४०५ क्रमांकाच्या खोलीत धाड घातली असता तेथे टीव्हीवर सामना सुरू होता व तीन जण फोनच्या माध्यमातून क्रिकेट सट्टेबाजी खेळत होते. पोलिसांनी अजय विजय सोनी (३०, कोरबा, छत्तीसगड), विनय निलकमल वर्मा (कोरबा, छत्तीसगड) व तरंग पवन अग्रवाल (कोरबा, छत्तीसगड) यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केली असता हरीष केसरवानी (४५, कोरबा, छत्तीसगड) व हॉटेल संचालक उमेश शेंडे (आंबेडकर चौक, वर्धमाननगर) यांच्या मदतीने क्रिकेट सट्टेबाजी सुरू असल्याची त्यांनी कबुली दिली.मागील १५ दिवसांपासून आरोपी हॉटेलमधून हे रॅकेट चालवत होते. त्यांच्याजवळून टीव्ही, लॅपटॉप, ३ महागडे मोबाईल, कार जा १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरोधात लकडगंज पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव जाधव, साईनाथ रामोळ, संदीप शिंदे,आनंद मरस्कोल्हे, शकील शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.