टीनशेडमध्ये बेकायदा साठा : ‘एएसपी’ पथकाची कारवाई
नागपूर , दि. २–एक, दीड वर्षात अनेकवेळा कारवाया करूनदेखील मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा ते मलकापूरदरम्यान बेकायदा बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा सुरूच आहे. त्याची पोलखोल खामगावच्या एएसपी पथकाने १ मे रोजी मध्यरात्री छापा मारून केली. टीनशेडमध्ये साठविले जात असलेले ८ हजार २०० लीटर बायोडिझेल ट्रकसह या कारवाईत जप्त करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा-मलकापूरदरम्यान एका ढाब्याच्या बाजूला टीनशेडमध्ये मोठ्या प्रमाणावर बायोडिझेल साठविले जाते. तेथून अवैधरित्या इतरत्र विक्री केली जात असल्याची पक्की खबर खामगाव येथील अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, अलर्ट होत पथकाने १ मे रोजी मध्यरात्री छापा मारला. जीजे-१५-एक्स-८१३१ क्रमांकाच्या ट्रकमधून आलेले बायोडिझेल उतरवून घेतले जात होते. पोलिसांनी धाड घालून ट्रक जप्त केला. ट्रक व टिनशेडमध्ये साठविले जाणारे ८ हजार २०० लिटर बायोडिझेल हस्तगत करण्यात आले.
मात्र, पोलिसांना गुंगारा देत ट्रकचालक फरार झाला. अब्दुल हमीद अब्दुल बासित (४२, रा. वडनेर भोलजी) याला ताब्यात घेण्यात आले.
…अन् पोलिसाने चालवत नेला ट्रक
ट्रकचालक फरार झाल्याने पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर वायाळ यांनी जप्त केलेला ट्रक स्वत: चालवत ग्रामीण पोलीस स्टेशनला आणला. पोलीस अंमलदार श्रीकृष्ण नारखेडे, नीलेश चिंचोळकर, पोलीस शिपाई शिवशंकर वायाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.