शिकारीच्या तयारीत असलेला शिकारी वन विभागाच्या ताब्यात

0
12

भंडारा : वन परिक्षेत्रात शिकारीच्या इराद्याने आलेल्या इसमाला वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून शिकारींसाठीचे शस्त्र जप्त केले आहे. तसेच घरातून अस्वलाची दोन नखे देखील सापडून आली आहेत. त्याला प्रथम श्रेणी न्यायालय लाखनी चार दिवसांची वन कोठडी ठोठावण्यात आली आहे.वन विभागातील अड्याळ वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सहवनक्षेत्र किटाडीमधील नियतक्षेत्र- देवरी येथील कक्ष क्रमांक २१३ संरक्षीत वन येथे वन कर्मचारी गस्तीवर होते. यावेळी एक संशयीत मोटारसायकलने जाताना दिसुन आला. सदर इसमास थांबवुन चौकशी केली असता त्याच्या मोटारसाईकलच्या पेट्रोल टंकीवरच्या पॉकेटमध्ये एका खाताच्या बॅगमध्ये कागदामध्ये गुंडाळलेले एक लोखंडी काता व एक सुरा दिसुन आला. तसेच आणखी कसून विचारपूस केली असता रानडुक्कराची शिकार करण्यासाठी हे शस्त्र वापरले असल्याचे सांगितले. यानंतर त्याला ताब्यात घेतले.

तेजाबसिंग कांचनसिंग रामगडे (रा.झिरोबा टोली लाखांदूर) असे आरोपीचे नाव आहे. या संशयीत आरोपीने सांगीतलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या घरी झिरोबा टोली येथे झडती घेतली असता आरोपीकडुन अस्वलाची दोन नखे जप्त करण्यात आली. यांनतर त्याला ताब्यात घेत मा.प्रथम श्रेणी न्यायालय लाखनी यांच्या समक्ष हजर केले. न्यायालयाने आरोपीला ४ दिवसांची वनकोठडी मंजुर केली.