तिघांना जिवंत जाळणार्‍या आरोपीला फाशी;गोंदिया जिल्हा न्यायालयाचा निर्वाळा

0
58

गोंदिया : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पत्नीसह मुलगा व सासर्‍याला पेट्रोल टाकून जिवंत जाळणार्‍या आरोपीला आज (ता.९) जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. किशोर श्रीराम शेंडे रा.भिवापूर ता.तिरोडा असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की, पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेवून तिचा नेहमी छळ करीत असे. या जाचाला कंटाळून किशोर शेंडे याची पत्नी आरती शेंडे फेब्रुवारी २०२३ मध्ये रामनगर पोलिस ठाणे हद्दीतील सुर्याटोला येथे माहेरी आली होती. दरम्यान १४ फेब्रुवारीला आरोपीला किशोर शेंडे भिवापूर वरून दुचाकी एका कॅनमध्ये पेट्रोल घेवून सुर्याटोला येथे आला. रात्रीची वेळ बघून त्याने घरावर पेट्रोल ओतले. तसेच पत्नी ज्या खोलीत झोपली होती तिथेही पेट्रोल टाकून घराला आग लावली. या आगीत देवानंद सितकू मेश्राम (५२), आरती किशोर शेंडे व जय किशोर शेंडे (०४) या तिघांचा जळून मृत्यू झाला. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला तसेच प्रकरणाचा तपास पूर्ण करून प्रकरण न्याय प्रविष्ट केले. प्रकरणाची सुनावणी ७ मे रोजी पूर्ण होऊन न्यायमुर्ती एन.बी.लवटे यांनी पुरावे व साक्ष तपासून आरोपीला दोषी धरले. दरम्यान आज (ता.९) या प्रकरणाचा निर्वाळा करीत भादंवि कलम ३०२ अंतर्गत फाशीची शिक्षा, कलम ४३६ अन्वये आजन्म कारावास व १० हजार रूपयाचा दंड अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणी सरकारी पक्षातर्पेâ अ‍ॅड.विजय कोल्हे यांनी बाजु मांडली. तर रामनगर पोलिस ठाण्यातंर्गत पैरवी अधिकारी म्हणून पोहवा देवानंद काशिकर यांनी काम बघितले. विशेष म्हणजे, जिल्हा निर्मितीनंतर पहिल्यादाच एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.