चामोर्शी आणि आष्टी पोलिसांनी जप्त केला दारुसह २६.७५ लाखांचा मुद्देमाल

0
5

गडचिरोली : जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरित्या छुप्या मार्गाने दारु विक्री आणि वाहतूक केली जाते. त्याला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार ठिकठिकाणच्या पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसात चामोर्शी आणि आष्टी पोलिसांनी केलेल्या दोन कारवायांमध्ये दारूच्या पेट्या व वाहनांसह एकूण 26 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चामोर्शी पोलिसांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील मोकळ्या जागेत एक पांढ­ऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी (एम.एच 31, सीपी 3826) देशी-विदेशी दारुच्या पेट्यांनी भरुन ठेवली असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक बालाजी लोसरवार यांच्या नेतृत्वात पोउपनि दुर्योधन राठोड, राधा शिंदे, चालक मनोज सिंधराम व नायक ताडाम यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या वाहनाजवळ असलेले दोन इसम पोलिसांना पाहून पळून गेले. त्यानंतर त्या वाहनाची पाहणी केली असता त्यात देशी-विदेशी दारूच्या 3 लाख 49 हजार रुपयांच्या बाटल्या (निप) आढळल्या. त्या दारूच्या पेट्यांसह अंदाजे 4 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 7 लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पसार झालेल्या दोन्ही इसमांवर चामोर्शी पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक राधा शिंदे करीत आहे.

दुसऱ्या गुन्ह्यात आष्टी पोलिसांनी गोंडपिपरीकडून घाटकूर मार्गाने आष्टीकडे एका चारचाकी वाहनाने दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती आष्टीचे प्रभारी अधिकारी विशाल काळे यांना समजल्यानंतर पोउपनि दयाल व पथकाने आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाजवळ बॅरिकेटींग करुन एका संशयित वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहन भरधाव वेगाने चालवुन बॅरिकेटींगला धडक देऊन चामोर्शी मार्गाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या वाहनाचा पाठलाग करत चामोर्शी पोलिसांनाही त्याबाबत कळविण्यात आले. त्यामुळे चामोर्शी ठाण्याच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ नाकाबंदी लावण्यात आली. पुढे जाण्यास रस्ता नसल्याने हे वाहन त्या ठिकाणी थांबले. दरम्यान पाठलाग करीत असलेले पोउपनि दयाल हे पथकासह तिथे पोहचले. त्यांनी वाहनाची झडती घेतली असता त्यात 3 लाख 20 हजार रुपये किमतीची देशी-विदेशी दारू सापडली. याशिवाय एमएच 32, एएच -5556, (किंमत अंदाजे 15 लाख) असा एकूण 19 लाख 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी वाहनचालक नितेश वशिष्ठ चंदनखेडे (34 वर्ष), रा.नागसेन नगर, भद्रावती, जि. चंद्रपूर आणि त्यांचा सहकारी निखिल राजू क्षिरसागर (21 वर्ष), रा.गवराळा, भद्रावती, जि.चंद्रपूर यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोउपनि अतुल तराळे करीत आहे. या दोन्ही प्रकरणातील दारू कोणाकडून आणि कुठे पुरवठा केली जात होती याचा शोध घेऊन त्या आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

16 मार्चपासून आतापर्यंत 1.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

गेल्या 16 मार्च 2024 रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाली. या काळात दारूविक्रीला आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी नाकेबंदी करून दारू वाहतूक रोखण्यात आली. जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या अवैध दारु वाहतुकीला आळा घालण्याकरीता विशेष मोहिम राबविण्यात आली. यामध्ये आचारसंहिता सुरु झाल्यापासून ते आजपर्यंत दारु व वाहने मिळून एकुण 1.82 कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.