अकोल्यात अपहरण करून एक कोटीच्या खंडणीचा डाव फसला

0
11

अकोला : शहरातील रायलीजीन भागातून व्यावसायिक अरुण वोरा यांचे अपहरण केल्यानंतर एक कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा अपहरणकर्त्यांचा डाव फसला आहे. दोन दिवसानंतर व्यावसायिक बुधवारी मध्यरात्री घरी सुखरूप परतले. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग देऊन पाच आरोपींना गजाआड केले. आरोपींकडून शस्त्रांसह मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.

शहरातील दगडीपूल परिसरात अरुण वोरा यांचे रिकाम्या काच बॉटलचे दुकान आहे. सोमवारी रात्री काम आटोपून ते घरी जाण्यासाठी निघाले असता तीन ते चार जणांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांना चारचाकी गाडीत डांबले. पांढऱ्या रंगाच्या गाडीतून भरधाव वेगात अपहरणकर्ते व्यावसायिकाला घेऊन पसार झाले. या प्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला. व्यावसायिकाचा शोध घेण्यासाठी पथके विविध भागात रवाना करण्यात आली होती. दोन दिवसांपासून व्यावसायिकाचा शोध न लागल्याने माहिती देणाऱ्यासाठी २५ हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेला देखील तपासाचे आदेश दिल्यावर दोन पथके गठित करण्यात आले. आरोपी मिथुन सुधाकर इंगळे रा.चिवचिव बाजार, अकोला,किशोर पुंजाजी दाभाडे, शरद पुंजाजी दाभाडे, दोन्ही रा. ग्राम कळंबेश्वर, फिरोज खान युसूफ खान रा.अकोला, अशिष अरविंद घनबाहादुर रा. बोरगाव मंजू, राजा सरफराज खान रा. कान्हेरी सरप, चंदु इंगळे रा.खदान व अन्य एक अशा आठ जणांनी अरुण वोरा यांचे अपहरण केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, अपहृत अरुण वोरा बुधवारी मध्यरात्री घरी परतले.

त्यांची विचापूस केली असता कान्हेरी सरप येथे एका घरात त्यांना कोंडून ठेवल्याचे समोर आले. पोलीस मागावर असल्याचे लक्षात घेताच आरोपींनी अपहृत व्यावसायिकाला धमकी देऊन ऑटोद्वारे घरी परत पाठवले. त्या ऑटोचालकाला ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारपूस केली. या प्रकरणात आठपैकी पहिल्या पाच आरोपींना पहाटे ५ वाजेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. पैशांची गरज असल्याने एक करोड रुपयांच्या खंडणीसाठी कट रचून अरुण वोरा यांचे अपहरण केल्याची कबुली आरोपींनी दिली. गुन्ह्यात वापरलेले वाहन, दोन देशी बनावटीच्या पिस्तुल, मोबाइल व इतर साहित्य असा एकूण तीन लाख ५० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांचेवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणात भा.दं.वि. कलम ३६४ (अ), तसेच आर्म ॲक्ट कलम ३, २५ प्रमाणे कलम वाढ करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.