आमगाव,दि.२१- :तालुक्यातील किंडगीपार येथे मद्यपी ट्रॅक्टर चालकाच्या लापरवाहीने एका महिलेचा जीव गेला. अनियंत्रित ट्रॅक्टर थेट घरात शिरला. या घटनेत कापड धुत असलेले महिला ट्रॅक्टरमध्ये सापडल्याने ठार झाली तर घरातील इतर दोन मुली थोडक्यात बचावल्या. ही घटना किंडगीपार येथील आहे. किसनाबाई बुधराम चोरवाडे (५८) असे मृत महिलेचे नाव आहे.माहितीनुसार, आमगाव नगर परिषद क्षेत्रातंर्गत येणार्या किंडगीपार येथे किसनाबाई बुधराम चोरवाडे यांचे घर आहे. घराला लागून रस्ता आहे. आज, किसनाबाई बुधराम चोरवाडे ह्या दैनंदिन कामकाजाप्रमाणे घरातील अंगणात कापड धुत होत्या. तर दोन मुली (नात) घरात खेळत होती. त्यातच मद्यधुंदीत असलेला संदीप कोरे हा शेत कामे आटोपून ट्रॅक्टर क्र.एमएच-३५/जी-१६३७ घेवून जात होता. किसनाबाई चोरवाडे यांच्या घराजवळ येताच ट्रॅक्टर अनियंत्रित झाला. चालकाचा नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रॅक्टर थेट घरात शिरला.
या घटनेत ट्रॅक्टरखाली आल्याने किसनाबाई चोरवाडे यांचा मृत्यू झाला. तर घरात खेळत असलेल्या दोन मुली थोडक्यात बचावल्या. प्रत्यक्षदर्शीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरूवात केली. तसेच घटनेची माहिती आमगाव पोलिसांना देण्यात आलीी. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. व आरोपीसह ट्रॅक्टर ताब्यात घेतले. उल्लेखनिय असे की, ट्रॅक्टरची ट्रॉली ही विनानंबर असलेली होती. तर चालक मद्यधुंदीत असल्याचे बोलले जात आहे. आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून तपासकार्याला सुरूवात केली आहे.