नगर रचना विभागाच्या महिला अधिकाऱ्याने सुपारी देऊन केली वृद्ध सासऱ्याची हत्या

0
26

गडचिरोली : कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवर डोळा ठेवून ती हडपण्याच्या नादात गडचिरोलीत कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने चक्क स्वत:च्या सासऱ्याची सुपारी देऊन हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. अर्चना पुट्टेवार (रा.मानेवाडा, नागपूर) असे त्या महिला अधिकाऱ्याचे नाव असून त्या गडचिरोलीत नगर रचना विभागात सहायक संचालक म्हणून कार्यरत आहे. सुरूवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणाला दोन आठवड्यानंतर वाचा फुटली आणि सुपारी देऊन हत्येचे हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात महिला अधिकारी अर्चना पुट्टेवार हिच्यासह तीन आरोपींना अटक करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, अर्चना पुट्टेवार हिचे सासरे पुरूषोत्तम पुट्टेवार (82 वर्ष) रा.शुभनगर (मानेवाडा, नागपूर) यांचा गेल्या 22 मे रोजी मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीचे आॅपरेशन झाले होते. त्यामुळे दवाखान्यातून ते मुलीच्या घरी जात असताना एका कारने त्यांना धडक दिली. दरम्यान पुरूषोत्तम पुट्टेवार यांच्या चुलत भावाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांची हत्या झाल्याची भिती व्यक्त केली. नागपूरचे पोलिस आयुक्त डॅा.रवींद्रकुमार सिंगल यांनी गुन्हे शाखेला त्यादृष्टिने तपास करण्याचे निर्देश दिले. नागपूर शहर पोलिसांच्या युनिट-4 ने केलेल्या चौकशीत घरातील कार चालक सार्थक बागडे याची भूमिका संशयास्पद आढळून आली. चौकशीत सचिन धार्मिक आणि नीरज निमजे यांची नावे समोर आली. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर सार्थक बागडे याच्या सांगण्यावरून नीरजने पुट्टेवार यांची हत्या केल्याची कबुली दिली. याशिवाय सार्थकला बोलते केल्यानंतर त्याने अर्चना पुट्टेवार यांच्या सांगण्यावरून हा हत्येचा कट रचल्याचे सांगितले.

असा रचला हत्येचा कट

गडचिरोलीत नोकरी करत असलेल्या पण मूळच्या नागपूर येथील असलेल्या अर्चना पुट्टेवारला ड्रायव्हरची आवश्यकता होती. तिची ओळख सचिन धार्मिक याच्यासोबत झाली. सचिनचे वडील चालवत असलेल्या भिसीची ती सदस्य होती. सचिनने त्याचा मित्र सार्थक बागडे याचे ड्रायव्हर म्हणून नाव सुचविले. यादरम्यान अर्चनाने सचिन याला आपले सासरे पुरूषोत्तम पुट्टेवार यांना संपविण्याची सुपारी दिली. याप्रकरणात आपले किंवा ड्रायव्हर सार्थक याचे नाव समोर यायला नको असे बजावले होते. त्यानुसार कट रचून एक जुनी कार खरेदी करण्यात आली. अपघात घडवून आणण्यासाठी निरज निमजे याची मदत घेण्यात आली. त्यासाठी निरजला 1 लाख 60 हजार रुपये मिळाले. प्लॅन ठरल्यानंतर 22 मे रोजी निरजने ती जुनी कार चालवली. सोबत सार्थकही त्या कारमध्ये होता. सचिन धार्मिक हा बाईकने पुट्टेवार यांच्या ई-रिक्षाचा पाठलाग करत होता. ते रिक्षातून खाली उतरताच नीरजने त्यांना कारने उडविले. हा एक अपघात आहे असा बनाव करण्यात आला.

लोभी अर्चनाच्या कमाईची चौकशी होणार का?

गडचिरोलीत नगर रचना विभागात सहायक संचालक पदावर असलेल्या अर्चना पुट्टेवार यांनी सासऱ्याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती हडपण्यासाठी त्यांचा खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. पण यानिमित्ताने त्यांच्या लोभी स्वभावाची ओळख पुढे आली आहे. त्यामुळे गडचिरोलीत नगर रचना विभागाकडून दिल्या जाणाऱ्या नवीन ले-आऊटसह अनेक कामांच्या मंजुरीसाठी त्यांनी मोठी कमाई केली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी केल्यास काही नियमबाह्य कामे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय त्यांच्या कमाईची चौकशी करण्याचीही आवश्यकता व्यक्त केली जात आहे.