वादळी पावसामुळे झाडे कोलमडली घरांचे छत उडाले
गोंदिया, ता. ८ ः शुक्रवारी (ता. ७) दिवसभर कडाक्याचे उन तापत असताना रात्री साडेआठच्या सुमारास अचानक गोंदिया शहर, गोरेगाव तालुक्यातील डव्वा शहारवानी खमारी आणि फुलचूर परिसराला जोरदार वादळाचा तडाखा बसला. पावसाच्याही सरी कोसळल्या. वादळवाऱ्यात छतावरचे टीनपत्रे उडाली. मोठ्या प्रमाणात झाडे आणि विद्युत खांबे कोसळून ताराही तुटल्या. होर्डींगही कोसळले,त्यामुळे शहरातील बहुतेक भागातील नागरिकांना तसेच खमारीवासींना रात्रभर अंधारात राहावे लागले.
पावसाची चाहुल लागली असली तरी शुक्रवारी शहरासह जिल्ह्यात दिवसभर कडाक्याचे उन तापत होते. ४१.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. जीवाची लाहीलाही होत असताना दुपारच्या वेळी सहसा कोणी बाहेर पडत नव्हते. अशी स्थिती असताना आणि पावसाची किंबहुना वादळाची कुठलीही
चिन्हे नसताना रात्री साडेआठच्या सुमारास गोंदिया शहरात जोरात वादळवारा सुटला. क्षणात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडात पावसानेही दमदार हजेरी लावली. गोंदिया शहर आणि लगतच्या खमारी, फुलचूर गावाला या वादळाचा चांगलाच फटका बसला. शहरातील बहुतांश भागात झाडे कोसळली. तारा तुटल्या. काहींच्या छतावरचे टीनपत्रेही उडाली. त्यामुळे कित्येक नागरिकांना अख्खी रात्र अंधारात आणि गरमीत काढावी लागली. हीच स्थिती खमारीवासींची होती. वादळाचा सर्वाधिक फटका या गावाला बसल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. रात्री साडेआठनंतर सोसाट्याचा वारा वाहवा असा वादळवारा अचानक सुटला. गावाला वादळाने चोहोबाजूंनी घेरले. यात गाव व परिसरातील झाडे, विद्युत खांब कोसळले. काही विद्युत खांब अक्षरशः वाकून गेले. तारा तुटल्या. त्यामुळे संपूर्ण गाव अंधारात होते. डास आणि गरमीत संपूर्ण रात्र गावकऱ्यांना जागून काढावी लागली. या वादळामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.
खमारीवासी रात्रभर अंधारात…
वादळवाऱ्यामुळे जागोजागी विद्युत खांब कोसळल्याने आणि वीज तारा तुटून पडल्यामुळे खमारीत रात्री साडेआठनंतरच वीजपुरवठा ठप्प झाला होता. रात्रभर वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. शनिवारी (ता. ८) दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम महावितरणकडून सुरू होते.