नागपूर,दि.३० : शहरातील एका नामांकित हिंदी वृत्तपत्रात शहर संपादक म्हणून कार्यरत खंडणीखोर आरोपीला पोलिसांनी अटक केली. १० लाखाची खंडणी मागितल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ही रकम तो इस्टालमेंटनुसार घेत होता. यापूर्वी एक लाख तर आता ८० हजार रुपयाची खंडणी घेतांना सदर पोलिसांनी त्यास रंगेहात पकडले. ही कारवाई सदर पोलिसांनी सिव्हिल लाईन स्थित व्हिसीए मैदानाजवळील चहाच्या टपरीवर गुरुवारी दुपारच्या सुमारास केली. या कारवाईमुळे पोलिस आणि वृत्तपत्र क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. वृत्तपत्रात बातमी प्रकाशीत करुन बदनामी करण्याची आरोपीने धमकी देऊन खंडणीसाठी त्यांची अडवणूक केल्याचा आरोप आहे.
सुनील सुखलाल हजारी (Sunil Hazari) (४४) रा. राहुल रेसिडेन्सी, एसटी बस स्टँड जवळ, फ्लॅट नंबर ५०४, पाचवा माळा, गणेशपेठ, असे अटकेतील आरोपी खंडणीखोराचे नाव आहे. धनराज उर्फ टिटू साधूराम शर्मा (५५) रा. बाबा दीपसिंगनगर, प्लॉट नंबर ५६४, सुगतनगर, पीएस कपिलनगर असे फिर्यादी पीडीताचे नाव आहे. शर्मा हे आरटीओमध्ये एजंट म्हणून काम करतात.
प्रादेशिक परिवहन विभागाने एका प्रकरणात काही अधिकार्यांना निलंबित केले होते. याप्रकरणी वृत्तपत्रात बातम्या सुध्दा प्रकाशित झाल्या. विशिष्ट पत्रकाराने काही बातम्या अधिकार्यांच्या बाजुनेही प्रकाशित केल्या. दरम्यान, प्रकरणाशी संबधित संपूर्ण माहिती आरोपीने मिळविली होती. आरटीओतील कर्मचार्यांशी ओळख असल्याचा फायदा घेत त्याने संबधित माहिती गोळा केली आणि फिर्यादीशी संपर्क साधला.
बातमी प्रकाशित करून त्यांना बदनामी करण्याची धमकी दिली. बदनामी टाळण्यासाठी दहा लाख रुपयाची मागणी केली. फिर्यादीने गयावया करीत माझी मुलगी लग्नाची आहे, तुम्ही माझी बदनामी करू नका. आरोपीने सात लाख रुपये मागितले. सात लाखांवर सौदा पक्का झाला. पहिली किस्त एक लाख रुपये घेतली. नंतर गुरूवारला पुन्हा एक लाख रुपये देण्याचे ठरले. वेळ आणि जागा निश्चित झाली. ठरल्याप्रमाणे आरोपी आणि फिर्यादी व्हीसीए जवळील एका चहाच्या पटरीवर भेटले. मात्र, फिर्यादीने ८० हजार रुपयेच आणले. उर्वेरीत वीस हजार रुपये नंतर देणार असल्याचे सांगितले.
तत्पूर्वी फिर्यादीने सदर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी सापळा रचला आणि परिसरात दबा धरून बसलेल्या पोलिसांंनी ८० हजार रुपयाची खंडणीची रक्कम स्वीकारतांना आरोपी सुनील हजारी याला वेळीच रंगेहात पकडले. सदर पोलिसांनी खंडणीखोर आरोपीवर भादंविच्या कलम ३०८ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. (Sunil Hazari) आरोपी सुनीलला शुक्रवारी न्यायालयात उपस्थित करण्यात येणार आहे. पोलिसांनी दरवेळीप्रमाणेच यावेळीही निर्भीडतेने केलेल्या कारवाईची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
गणेशपेठमध्ये नुकताच घेतला कोट्यवधीचा बंगला
आरोपी सुनील हजारीकडे एक कार असून गणेशपेठ परिसरात एक हजार स्केअरफूट क्षेत्रफळ असलेला फ्लॅट आहे. अंदाजे ८ वर्षापूर्वी त्याने तो विकत घेतला असावा. फ्लॅटची आज बाजारभावाप्रमाणे ५० लाख रुपये किंमत आहे. तर अंदाजे सहा महिन्यापूर्वी हजारीने याच परिसरात दुमदार असा दोन माळ्याचा बंगला विकत घेतला. बंगल्याची बाजारभावाप्रमाणे दीड कोटी रुपये किंमत असल्याचे सांगितल्या जाते.