भंडारा : रिक्त जागा व अपूऱ्या यंत्रसामुग्रीचा ठपका ठेवत राज्यातील एकूण ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नाकारली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने केलेल्या तपासणीनंतर आठ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांची मान्यता लांबणीवर पडली आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्याचाही समावेश आहे. वर्षभरापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने भंडारा वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता दिल्यानंतर भंडारा जिल्हावासीयांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न साकार होईल ,असे वाटत असताना आता पुन्हा यावर टांगती तलवार आली असून नवीन मंजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर्स तयार व्हावेत व नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा या दृष्टीने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय २०२३ मध्ये शासनाने घेतला. त्यावेळी या मान्यतेमुळे भंडारा येथे वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला होता. वैद्यकीय महाविद्यालयासाठी भंडारा शहरापासून अंदाजे १५ किमी अंतरावर असलेल्या पलाडी येथील सरकारी मालकीची २७.२५ हेक्टर पैकी २२ हेक्टर जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र प्रस्तावित महाविद्यालयांपैकी अनेक महाविद्यालयांच्या इमारतींचे काम अपूर्ण आहे. या महाविद्यालयात प्रवेशासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या पथकाने पाहणी केली असता प्राध्यापक, वसतिगृहे, पुस्तके, फर्निचर, उपकरणे आणि ग्रंथालये उपलब्ध नसणे, शिक्षक नियुक्त नसणे, बायोमेट्रिक्स बसवले नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी नाकारल्याच्या निर्णयाच्या विरोधात अपिल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आयोगाने केलेल्या तपासणीत काही मानकांची पूर्तता न झाल्याने भंडारा जिल्ह्यातील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी नाकारत आली आहे. या निर्णयाच्या विरोधात आता अपील केले जाणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये निकाल येणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया भंडाऱ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रभारी अधिष्ठाता डॉ. विपुल अंबादे यांनी दिली आहे.