गोंदिया -बदलापूर, अकोला, चंद्रपूर येथील घटना ताज्या असताना तालुक्यातील एका गावात जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकाने शाळेतीलच 16 वर्षीय विद्यार्थिनीच्या घरी जाऊन अश्लिल चाळे करून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी विद्यार्थिनीच्या तक’ारीवरून तिरोडा पोलिसांनी आरोपी शिक्षकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. उमेश टीकाराम मेश्राम (50) रा. मेंढा ता. तिरोडा जि. गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
सविस्तर असे की, पिडीता ही तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. आरोपी उमेश मेश्राम हा याच शाळेत वर्ग 5 ते 7 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवितो. 22 ऑगस्ट रोजी पिडीता ही शाळेला सुट्टी झाल्यानंतर घरी आली. गणवेश बदलून ती घराच्या हॉलमध्ये खुर्चीवर बसली असता आरोपी उमेशही तिथे आला व बेडवर बसला. दरम्यान उमेशने पिडीतेला दूर खुर्चीवर का बसली आहे, माझ्याजवळ येऊन बस असे म्हटले, मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझे पण माझ्यावर प्रेम आहे का, प्रेमाला वयाचे बंधन नसते, असे म्हणून तिला मिठी मारली. अश्लील चाळे केले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर पिडीता नकार देत असताना त्याने तिचे केश ओढून, पकडून त्याच्या मोबाईलवर अश्लील फोटो व चित्रफीत दाखवली. पिडीता प्रचंड घाबरली, सर तुम्ही माझे शिक्षक, गुरु आहात असं करू नका, माझा भाऊ आला असे म्हणून तिने आरोपीच्या तावडीतून आपली सुटका केली.
यानंतर पीडीतेचा भाऊ आल्यानंतर आरोपी त्याच्यासोबत बोलत बसला. यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी सातनंतर त्याने पीडितेच्या व्हाट्सअपवर अश्लील संदेश पाठविला. दरम्यान पीडीतेने घडलेला प्रकार तिच्या मानस भावाला सांगितला. दुसर्या दिवसी त्याने शाळा गाठून आरोपी उमेशला जाब विचारला. दरम्यान आरोपीने माफी मागितली व घडलेला प्रकार कोणालाही सांगू नका, अशी विनंती केली. पिडीता या प्रकाराने प्रचंड तनावात होती. यानंतर तिने 30 ऑगस्ट रोजी घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. तिने त्याच दिवशी कुटुंबीयांसह तिरोडा पोलीस स्टेशन गाठून आरोपी उमेश विरोधात तक’ार दाखल केली. पोलिसांनी आरोपी शिक्षक उमेशवर बाललैंगिक अत्याचार अधिनियम, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व अधिनियमांसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून मध्यरात्री अटक केली. आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी ठोठावली असून भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात तिरोडा पोलिस करीत आहेत.
आरोपी शिक्षक उमेश मेश्राम गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत तिरोडा तालुक्यातील सुकळी (डाक) येथे कार्यरत आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाल्याचे कळताच गोंदिया शिक्षण विभागाने तत्काळ प्रभावाने आरोपी शिक्षक मेश्रामला निलंबित केले आहे.