Courtगोंदिया: एका सात वर्षीय बालिकेवर अत्याचार करणार्या नराधमाला प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायधिश ए. टी. वानखेडे यांनी 15 वर्षाचा सश्रम कारावास व 9 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.हा निर्वाळा 30 ऑगस्ट रोजी दिला. नरेश भैय्यालाल जावळकर (35) रा. गोंदिया असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी नरेश जावळकर हा 28 ऑगस्ट 2018 रोजी पीडित मुलीच्या घरी गेला. पीडिता तिच्या घरी फुले तोडत असताना आरोपी नरेशने तिला भुलथापा देत घरात नेवून लैंगिक अत्याचार केला. यानंतर कुटुंबिय घरी आल्यानंतर पीडितेनेही घडलेला प्रकार कुटुंबियाना सांगितला. दुसर्या दिवशी पिडीता व तिच्या आईने गंगाझरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी नितिन विनायक यादव यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये विशेष न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
सरकारी वकिल कृष्णा पारधी यांनी 7 साक्षदारांना न्यायालयासमोर हजर केले. दोन्ही पक्षाच्या वकिलांकडून झालेल्या युक्तीवादानंतर साक्ष व पुराव्यावरून दोष सिद्ध झाला. न्या. वानखेडे यांनी कलम 376 (अ) (ब) सहकलम 511 अंतर्गत 10 वर्षाचा सश्रम कारावास व 5 हजार रुपयाचा दंड तसेच दंड न भरल्यास 4 महिन्याचा अतिरिक्त कारावास तसेच लैंगिक अत्याचार कायद्यान्वये 5 वर्षाचा सश्रम कारावास व 4 हजार रुपयाचा दंड, दंड न भरल्यास तीन महिन्याचा अतिरिक्त कारावास असा 15 वर्षाचा सश्रम कारावास व 9 हजार रुपयाचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे आदेशीत केले. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस कर्मचारी धीरज तिवारी यांनी काम पाहिले.