नागपूर : इंस्टाग्रामवरुन ओळख झालेल्या युवकाचे उमरेडमधील एका युवतीशी प्रेमसंबंध जुळले. त्याने फिरायला नेण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. प्रियकराच्या या कृत्यामुळे प्रेयसीला धक्का बसला. तिने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी प्रियकराला दिली. त्यामुळे त्याने प्रेयसीचा ओढणीने गळा आवळून खून केला.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याच्या भीतीमुळे प्रेयसीचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. लोकेश जुगनाके (३०, रा. अड्याळ) असे आरोपी युवकाचे नाव आहे.उमरेडमध्ये आई व भावासह पूजा (२२) राहत होती. ती बीए पदवीच्या द्वितीय वर्षाला शिकत होती. तिचे इंस्टाग्रामवरुन लोकेश जुगनाके या युवकाशी सूत जुळले. दोघांचाही इंस्टाग्रामवरुन नेहमी संपर्क होत होता. गेल्या वर्षभरापासून दोघांचेही प्रेमसंबंध होते. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. पूजानेही त्याला लग्नास होकार दिला होता. पूजाने आपल्या आईशी त्याची ओळख करुन दिली. लोकेशने तिच्या आईलाकडेही पूजासोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. गेल्या काही दिवसांपासून लोकेश हा पूजाला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करीत होती. मात्र, पूजाने वारंवार नकार देत होती. त्यामुळे नाईलाजाने लोकेश तिच्याशी गोड-गोड बोलून अनेकदा तिला शारीरिक संबंधाची मागणी करीत होता. मात्र, ती नेहमी त्याला नकार देत होती. गेल्या रविवारी तिला फिरायला जाण्यासाठी तिला विचारणा केली. तिने होकार दिला आणि आईला बाहेर मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. दोघेही दुचाकीने दुपारी एमआयडीसीकडे जाणाऱ्या महामार्गाने फिरायला गेले होते. रात्र झाल्यामुळे तिने घरी सोडण्यास सांगितले. मात्र, त्याने ब्रम्हपुरीतील एका मित्राकडे जेवण करायला जायचे असल्याचे सांगितले. दोघेही त्या मित्राच्या घरी गेले. तेथे दोघांनी जेवण केले आणि रात्री आठ वाजता ते दुचाकीने उमरेडकडे जायला निघाले.
घराकडे जात असताना लोकेशने एमआयडीसी रस्त्यावर दुचाकी थांबवली. यावेळी लोकेशच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्याने महामार्गावरील एका जंगलात नेले. तेथे तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे लोकेशने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारामुळे पूजाला संताप आला. तेथेच दोघांचा वाद झाला. तिने उमरेडला पोहचल्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन बलात्कार केल्याची तक्रार देणार असल्याचे लोकेशला सांगितले. त्यामुळे लोकेश घाबरला.
प्रेयसीचा ओढनीने आवळला गळा
पूजाच्या तक्रारीवरुन पोलीस बलात्काराचा गुन्हा दाखल करतील आणि अटकसुद्धा करतील, अशी भीती लोकेशला होती. त्यामुळे त्याने गुन्हा दाखल होण्याच्या भीतीमुळे पूजाचा ओढणीने गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून त्याने पळ काढला. सोमवारी सकाळी हे खून झाल्याची घटना उघडकीस आली. पूजाच्या हातावर ‘लोकेशने माझा बलात्कार केला.’ असे लिहलेले आढळले. ठाणेदार धनाजी जळक यांनी खून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करुन चंद्रपुरातून लोकेशला अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून शुक्रवारी त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात येणार आहे.