राज तिवारी यांस वैयक्तिक सुवर्णपदक तर पुरुष संघास प्रथमच उपविजेतेपद
मुंबई.दि.२१ नोव्हेंबरः मंगळूर विद्यापीठ येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने उल्लेखनिय कामगिरी करत सुवर्ण पदकाचा बहुमान मिळवला आहे. राज तिवारी या खेळाडूने ३० मिनिटे ५९ सेकंद वेळ देत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवत मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात नोंद केली आहे. मुंबई विद्यापीठास पहिल्यांदाच क्रॉसकंट्री स्पर्धेत वैयक्तित गटात सुवर्ण पदक आणि पुरुष संघाला उपविजेते पदाचा बहुमान मिळाला आहे. भारतीय विद्यापीठ संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी भारतातील १३७ विद्यापीठांतील ८५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
क्रॉसकंट्री स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या पुरुष संघाने ७१ गुण मिळवून पहिल्यांदाच उपविजेतेपद पटकावले. यामध्ये विजेत्या मंगळूर विद्यापीठास ६९ गुण मिळाले तर तृतीय क्रमांकाच्या विद्यापीठास ८३ गुण मिळाले. मुंबई विद्यापीठाच्या संघामध्ये राज तिवारी, मृणाल सरोदे, रोहन चौधरी, माणिक वाघ, सुरज झोरे आणि हेमंत निशाद यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. स्पर्धेतील खेळाडूंना सन्मानचिन्ह, रोख रक्कम आणि स्टॉप वॉच देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई विद्यापीठ संघाचे मार्गदर्शक म्हणून राहुल अकुल आणि व्यवस्थापक शशांक उपशेट्टे यांनी काम पाहिले.
क्रॉसकंट्री स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र.कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या संघाचे आणि सुवर्ण पदक विजेता राज तिवारी यांचे अभिनंदन करून भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभले.