धारदार शस्त्राने मारून तरुणाचा खून

0
227

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील भिवापूर येथील नाल्याजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका तरुणाचा मृतदेह रविवारी (दि.२४) सकाळी ९:३० वाजता आढळला. अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची बाब पोलिसांनी केलेल्या मोका पंचनाम्यादरम्यान पुढे आली. सुनील चंद्रकुमार तुमळे (३२) रा. भुराटोला असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तिरोडा तालुक्यातील भुराटोला येथील सुनील तुमळे (३२) याच्या गावापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या भिवापूर गावाच्या परिसरात मुख्य रस्त्यापासून ५० फूट आत त्याचा मृतदेह रविवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात आढळला. सुनील मोटारसायकल एमएच ३१, वाय ७५९८ ने २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता भिवापूर परिसरात गेला होता. पण तो घरी परतला नाही. रविवारी सकाळी त्याची मोटारसायकल रस्त्यालगत उभी होती. अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने तीन घाव घातले. यात एक घाव खोलवर तर दोन घाव सामान्य होते. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात त्याची आई चंद्रकला चंद्रकुमार तुमळे (५२) यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक अमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संजय कावळे करीत आहेत.

वडील खुनाच्या प्रकरणात तुरुंगात
मृत सुनीलचे वडील चंद्रकुमार तुमळे हे एका खुनाच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. सुनील आणि त्याची आई चंद्रकला हे दोघेच मायलेक घरी राहात होते. सुनीलचा धारदार शस्त्राने मारून खून करण्यात आल्याने व त्याचे वडील खुनाच्या प्रकरणात तुरुंगात असल्याने त्या खुनाचा वचपा काढण्यासाठी तर सुनीलचा खून झाला नाही या दिशेने सुद्धा पोलिस तपास करीत आहेत. नेमका खून कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणाचा तपास तिरोडा पोलिस करीत आहेत.