तुमसर : दुचाकी चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवित असताना ओव्हरटेकच्या नादात दुचाकीला अपघात झाला .या घटनेत एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना १ डिसेंबर रोजी मोहाडी एमआयडीसीसमोरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ सायंकाळी सहा वाजता घडली. अनिल गौतम (२८, रा. बुटीबोरी, नागपूर) मूळ गाव गोरेगाव तालुक्यांतील दावडीपार असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून, अमोल पटले (२५, रा. मुंडीपार, तिरोडा) असे जखमी युवकाचे नाव आहे.
दोन्ही युवक नागपूरहून भंडारा-मोहाडी-तुमसरमार्गे मुंडीपार (तिरोडा) येथे जात असताना ओव्हरटेक करताना
अपघात झाला. भरधाव दुचाकी अनियंत्रित झाल्याने दोघेही रस्त्यावर पडले. त्यामध्ये अनिल गौतम याचा जागीच मृत्यू झाला, तर अमोल पटले गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह मोहाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, जखमीला तातडीने भंडारा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. घटनेचा तपास मोहाडी पोलीस करीत आहेत.