गडचिरोली : जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असताना वाढदिवशी तलवारीने केक कापून ‘भाईगिरी’ करणाऱ्या कुरखेडा येथील युवकांना पोलिसांनी दणका देत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. ६ डिसेंबर रोजी संबंधित घटनेची चित्रफित समाज माध्यमावर सार्वत्रिक झाल्यानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कारवाईचे निर्देश दिले होते.
तौसिफ रफीक शेख (३६),अशफाक गौहर शेख(३४), परवेज फिरोज पठाण (२५), शाहरूख नसिम पठाण(२५) व इतर सर्व राहणार कुरखेडा अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तलवार व दीड हजार रुपये रोख देखील जप्त करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात अवैध दारू व रेती तस्करीला उत आला आहे. यामुळे गुंडगिरीदेखील वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. दरम्यान, ३० नोव्हेंबररोजी आरोपीमधील एकाचा वाढदिवस होता. यावेळी काही युवकांनी एकत्र येत हुल्लडबाजी करीत तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी या प्रसंगाची चित्रफित बनवून समाज माध्यमावर देखील टाकली. विशेष म्हणजे घटनेच्यावेळी जिल्ह्यात जमावबंदी लागू होती. दरम्यान ६ डिसेंबररोजी संबंधित घटनेची चित्रफित सर्वत्र ‘व्हायरल’ झाली. सदर बाब गंभीर असल्याने पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश देताच कुरखेडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपींना ताब्यात घेत विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. यावेळी पोलिसांसमोर आरोपींनी गुन्हा कबूल करून अशाप्रकारचे कृत्य यापुढे करणार नाही, म्हणून माफी मागितली. या संदर्भातील चित्रफित पोलीस विभागाने जारी केली आहे. या कारवाईमुळे ‘भाईगिरी’ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कुरखेड्यातील नागरिकांनी स्वागत केले असून यामुळे परिसरातील गुंडगिरीला आळा बसेल अशी अशा व्यक्त केली आहे.