सातारा,दि.१२ः- गेल्या काही वर्षांपासून राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बदलत्या काळासोबत आपली “कात” टाकली असून बदलत्या युगाशी जुळवून घेतले आहे. समाजातील लाचखोर व भ्रष्टाचारी लोकांना धडा शिकविण्यासाठी त्यांच्याच पद्धतीने चाली टाकत अशा लोकांना मात देत लाचखोरीच्या खेळातील नामी मोहरे गळाला लावले आहेत.त्यातच ११ डिसेंबरला महाराष्ट्र एसीबीने आपली अत्त्यूच्य अशी कारवाई करीत चक्क राज्याच्या न्याय यंत्रणेतील एका न्यायाधीशालाच जेरबंद करून देशातील अख्ख्या न्याय यंत्रणेलाच आव्हान दिले आहे.
न्यायाधीशांवर लाचखोर आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत अडकलेल्या आरोपींना शिक्षा देण्याची जबाबदारी दिलेली आहे.त्याच यंत्रणेतील एका जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायधीशांलाच लाच मागणीच्या प्रकरणांत आरोपी करण्याची पाळी एसीबीच्या अधिकाऱ्यांवर आली आहे.
समाजातील पीडित व अन्यायाने त्रस्त झालेल्या लोकांचे अत्याचारा विरुद्ध दाद मागण्याचे अंतिम आशा स्थान म्हणजे न्यायालय. लोकशाही प्रक्रियेत न्यायाची अपेक्षा करीत राज्यातील जनता मोठ्या आशेने न्यायालयात न्यायाची मागणी करण्यासाठी जाते. मात्र ह्याच व्यवस्थेतील एका न्यायाधीशावरच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केल्या जाते त्यामुळे, सर्वसामान्यांच्या न्याय-हक्काचं शेवटचे आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला देखील आता तडा गेलेला आहे.
पुणे आणि सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संयुक्तपणे साताऱ्यात आश्चर्यकारक अशी फार मोठी कारवाई केल्यामुळे संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशहांविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात लाचखोरीच्या प्रकरणांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम सह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणीच्या प्रकरणांत पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरू केली आहे. पाच लाख रुपयांच्या लाच मागणी प्रकरणात न्यायाधीशांसह मदत करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम ह्यांच्या अटकेसाठी राज्याच्या मुख्य न्यायमूर्तींना परवानगी मागण्यात आली आहे. न्यायपालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की ही तक्रार देणाऱ्या फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली होती, विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या घडामोडी घडल्या आहेत. येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सर्वांना रंगेहात पकडले, त्यानंतर कायदेशीररित्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने सातारा जिल्ह्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. ज्या न्यायव्यवस्थेवर सर्वसामान्य माणसाचा शेवटचा विश्वास असतो, त्याच न्याय व्यवस्थेतील एका जबाबदार न्यायाधीशां वरच लाचखोरीच्या प्रकरणांत कारवाई झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सर्वसामान्य जनतेचा विश्वास हा न्यायपालिकेवर आहे,पोलिस यंत्रणांकडून अन्याय झाला तरी न्यायालयात आपणास दाद मिळेल,न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या न्यायमूर्तींकडून आपल्यावरील अन्याय दूर होईल,अशी सर्वसाधारण लोकांची भावना असते. मात्र चक्क न्यायाधीश असलेल्या व्यक्तीवर लाच मागणीचा गुन्हा दाखल झाल्याने आता विश्वास कुणावर ठेवायचा ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पोलीस व प्रशासनातील भ्रष्टाचार व लाचखोरीच्या घटना नेहमीच समोर येत असतात मात्र थेट न्याय पालिकेतील वरिष्ठ न्यायमूर्तीच एसीबीच्या कारवाईत अडकल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गु.रं.नं. १११४/ २०२४, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७. ७ अ. १२ सह भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.त्यामध्ये धनंजय लक्ष्मणराव निकम, जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जिल्हा सत्र न्यायालय, सातारा (वर्ग-१),किशोर संभाजी खरात, रा. ७०/९, बीडीडी चाळ, वरळी, मुंबई (खाजगी इसम) व आनंद मोहन खरात (सम्राट जाधव), रा. खरातवाडी, दहिवडी, ता. मान, जि. सातारा (खाजगी इसम) व एक अनोळखी इसम यांनी फिर्यादीला चक्क ५,००,०००/- (पाच लाख) रुपये लाच मागणी केल्याची बाब पडताळणी अंती समोर आली आहे.
५,००,०००(पाच लाख) रुपये लाच मागणीच्या तक्रारीची पडताळणी दि.३/१२/२०२४ रोजी तक्रारदार यांचे राहते घरी करण्यात आली आहे.तर दि.९/१२/२०२४ रोजी बांधकाम भवन शेजारी,सातारा येथे पुढील कारवाई करण्यात आली आहे.महिला तक्रारदार यांचे वडीलांच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाणे येथे दि. २६/१०/२०२४ रोजी गुरनं. ९७२/२०२४, भा.दं.वि. कलम ४०६, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असून, त्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे व ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी सत्र न्यायालय,सातारा येथे जामीन अर्ज दाखल केलेला असून सदरचा जामीन अर्ज हा न्यायाधीश धनंजय लक्ष्मणराव निकम, जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, सातारा यांचे न्यायालयात सुनावणीकरीता प्रलंबित आहे. तो जामीन अर्ज मंजूर करुन तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी खाजगी इसम किशोर खरात व आनंद खरात यांनी न्यायाधीश धनंजय निकम यांच्या सांगण्याप्रमाणे व त्यांच्यासाठी तक्रारदार यांचेकडे ५,००,००० (पाच लाख) रुपयाच्या लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने, दि. ०३/१२/२०२४ रोजी व दि.०९/१२/२०२४ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता न्यायाधीश धनंजय निकम यांनी खाजगी इसम किशोर खरात व आनंद खरात यांच्याशी संगणमत करुन स्वतःसाठी तक्रारदार यांच्या वडीलांचा त्यांच्या कोर्टात प्रलंबित असलेला जामीन अर्ज मंजूर करुन तक्रारदाराच्या बाजुने निकाल देण्यासाठी नमूद दोन खाजगी इसमांचे मार्फतीने तक्रार दाराकडे ५,००,०००(पाच लाख) रुपयाच्या लाचेची मागणी करुन ती लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दाखवून तसेच ती लाच रक्कम नमुद खाजगी इसमांच्या करवी मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे.
लाच मागणी पडताळणी दरम्यान घडलेल्या घटनेच्या आधारे न्यायाधीश धनंजय लक्ष्मणराव निकम, जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, सातारा, खाजगी व्यक्ती किशोर संभाजी खरात, आनंद मोहन खरात व एक अनोळखी इसम यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाणे, जिल्हा सातारा येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७, ७ अ, १२ सह भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र,अपर पोलीस अधीक्षक डॉ.शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उपअधीक्षक अनिल कटके व त्यांच्या पथकाने केली.