आत्मघाती हल्ल्याचा संशय
काबूल:-अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भीषण स्फोट झाला आहे. ज्यामध्ये तालिबानचे निर्वासित मंत्री खलील रहमान हक्कानी आणि त्यांच्या तीन अंगरक्षकांसह १२ जणांचा मृत्यू झाला आहे. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे. आज बुधवारी काबूलमधील निर्वासित मंत्रालयाच्या कंपाऊंडमध्ये हा स्फोट झाला. राजधानी काबूलमध्ये मंत्रालयाच्या आवारात स्फोट झाल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. हा स्फोट कोणी घडवून आणला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीच्या आधारे हा आत्मघाती हल्ला मानला जात आहे. रिपोर्ट्सनुसार या स्फोटात हल्लेखोराचा देखील मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास असणारे अनेक लोक जखमी झाले आहेत.
आतापर्यंतच्या तपासात जे समोर आले आहे, त्यानुसार हा आत्मघाती हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आत्मघाती हल्लेखोर मंत्रालयात कसा पोहोचला? याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. खलील रहमान हक्कानी हे तालिबान सरकारमध्ये निर्वासित आणि स्थलांतर मंत्री होते. त्यांना ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबान सत्तेवर परतल्यानंतर कार्यवाहकच्या आधारावर ही जबाबदारी देण्यात आली होती. तालिबानचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे ते काका होते.
अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांतात जन्मलेले हक्कानी हे पश्तूनांच्या जदरान जमातीचे होते. अफगाण युद्धादरम्यान खलील रहमान हक्कानी यांच्यावर आंतरराष्ट्रीय निधी उभारण्याची जबाबदारी होती. ते हक्कानी नेटवर्कचे प्रमुख नेते होते. दरम्यान, ते गेल्या अनेक वर्षांपासून तालिबानसोबत काम करत होते. त्याआधी हक्कानी यांचा काहीकाळ अल-कायदा संघटनेशीही संबंध होता. २००२ मध्ये हक्कानी यांना पक्तिया प्रांतात अल-कायदा संघटना मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
खलील रहमान हक्कानी हे तालिबानचे अंतर्गत मंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे काका आणि हक्कानी नेटवर्कमधील एक प्रमुख व्यक्ती होते. ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर 7 सप्टेंबर 2021 रोजी निर्वासितांचे कार्यवाहक मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. इस्लामिक स्टेट आणि तालिबान यांच्यात सध्या संघर्ष सुरु आहे. त्यामुळे हा हल्ला इसिसकडून केला गेला असल्याची प्राथमिक माहिती आहे. पण या प्रकरणात कोणत्याही संघटनेने अद्याप जबाबदारी स्वीकारलेली नाही. इस्लामिक स्टेटने वारंवार असे हल्ले केले आहेत, ज्यामुळे अलीकडील काही महिन्यांत तालिबान सरकारसोबत त्यांचा तणाव वाढला आहे.