
लाखांदूर,दि.१७ः साकोली-लाखांदूर राज्य मार्गावरील दिघोरी/मोठी मार्गावर दोन पिकअप वाहनातून प्राण्यांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच दिघोरी/मोठी येथील पोलीस पथकांने त्या वाहनांचा पाठलाग करण्यास सुरवात केली.पाठलाग करतांना पिकअप वाहनाच्या मागच्या बाजूचा भाग पोलीस वाहनाला लागल्याने चालकाचे नियंत्रण सुटून पोलिसांचे वाहन पलटले गेले.यात सुदैवाने बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठी इजा झाली नसून, फक्त किरकोळ जखम झालेली आहे.सदरची घटना पोलीस ठाणे दिघोरीच्या अगदी १०० मीटर अंतरावर असलेल्या साकोली लाखांदूर हायवे वर रात्री ९:०० वाजताच्या सुमारास घडली.
जनावर तस्करीची माहिती नियंत्रण कक्षातून होताच दिघोरी ठाण्याचे ठाणेदार आशिष गद्रे यांनी आपले कर्मचारी पो.हवा. नवनाथ शिदने, पो.शी.उमेश वलके,अजित शेळके व पोलीस वाहन चालक आकाश सोनवणे यांना तस्करी रोखण्यासाठी लोकेशनच्या दिशेने पाठविले. त्या अनुषंगाने पथक दिघोरी बोंडगाव रस्त्यावर तस्कराच्या वाहनाची वाट बघत होते. पोलीस गाडी दिसताच बिना नंबर प्लेटच्या दोन्ही पिकअप वाहनांनी दिघोरी लाखांदूर रस्त्यावरून धूम ठोकली. यात वाहनाच्या सिनेस्टाईल पाठलाग करीत असताना अचानक तस्कराच्या गाडीच्या मागील बाजूची कट पोलीस वाहनाला लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. व पोलीस थानेलगत अगदी १०० मीटर अंतरावर पोलीस वाहनाने दोन ते तीन पलट्या मारल्या. सुदैवाने कोणत्याही प्रकारे पोलीस कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली नसून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून सुट्टी देण्यात आली. सदर घटनेचा तपास ठाणेदार आशिष गद्रे यांच्या मार्गदर्शनात सुरू असून, अज्ञात बिना नंबर प्लेटच्या दोन्ही पिकप वाहनावर कलम १२५अ, २८१ भारतीय न्यायसंहिता ११/५ प्राण्यांची जबरी वाहतूक व मोटर अॅक्ट कायदा १८४ अनंवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.