बार्शी: बार्शी ते येरमाळा रस्त्यावर मंगळवारी दुपारी पाथरी गावाजवळील वीज केंद्राजवळ भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
मृतांमध्ये महामुनी काळे (रा. वालवड, ता. भूम) आणि सारिका नितीन चव्हाण (वय ३२, रा. गुंदेगाव, ता. नगर) यांचा समावेश आहे. रवी चंद्रवंशी (रा. नायगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे जखमीचे नाव असून, त्यांच्यावर बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पाथरी गावातील ग्रामस्थ, चंद्रकांत चौधरी, पोलिस पाटील शंकर गायकवाड, नरसिंग गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी महत्त्वाची मदत केली. त्यामुळे रवी चंद्रवंशी यांचे प्राण वाचवणे शक्य झाले.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे आणि राहुल बोंदर यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा केला. संबंधित कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाहतुकीचे नियम पाळण्याचे आणि भरधाव वेगाने वाहन चालविण्याचे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.