७ लाखाचे बक्षिस असलेल्या जहाल माओवाद्याचे गोंदिया पोलीस दलासमोर आत्मसमर्पण

0
177

गोंदिया,दि.२७ः– ७ लाखाचे बक्षिस असलेल्या जहाल माओवाद्याने चळवळीतील त्रासाला कंटाळून २६ डिसेबंर रोजी जिल्हाधिकारी प्रजित नायर व पोलीस अधिक्षक गोरख भामरे,अप्पर पोलीस अधिक्षक नित्यांनंद झा यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे.देवा उर्फ अर्जुन उर्फ राकेश सुमडो मुडाम, वय 27,राहणार गुंडम सुटबाईपारा, पोस्ट- बासागुडा, तहसील- ऊसुर, पो. स्टे. पामेड, जिल्हा- बिजापुर (छ.ग.) (सदस्य तांडा दलम, मलाजखंड दलम, पामेड प्लाटून- 9/ प्लाटून पार्टी कमिटी मेंबर) असे आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्याचे नाव आहे.

देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करुन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थीक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत नक्षल आत्मसमर्पण योजना राबविली जात आहे.

गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक, नित्यानंद झा यांचे मार्गदर्शनाखाली माओवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याकरीता गोंदिया जिल्हयात प्रभावी नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत असुन विविध उपक्रम राबवून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेला/नागरीकांना देवून जनजागृती करण्यात येत आहे.

आत्मसमर्पित माओवादी देवा ऊर्फ अर्जुन ऊर्फ राकेश याचे मुळ गाव- बिजापुर जिल्हयातील अति नक्षल प्रभावित भागात असल्याने त्याचे गावात पुर्वी पासुनच सशस्त्र गणवेशधारी माओवाद्यांचे येणे जाणे होते.माओवाद्यांच्या भुलथापा व प्रलोभनांना बळी पडुन त्यांच्या निर्देशाप्रमाणे लहानपणापासुनच तो नक्षल चळवळीत सहभागी होवुन बाल संघटनमध्ये काम करीत होता. सन- 2014 मध्ये तो पामेड दलम (दक्षीण बस्तर), जि. बिजापुर मध्ये भरती झाला व शस्त्र हातात घेतले.
पामेड दलम मध्ये 6 महिने काम केल्यानंतर सन- 2014 चे अखेरीस त्याने अबुझमाड एरीया मध्ये अडीच महिन्याचे प्रशिक्षण घेतले, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यास सन 2015 मध्ये माओवाद्यांचे बस्तर एरीया मधुन एम. एस. सी. (महाराष्ट्र- मध्यप्रदेश -छत्तीसगड) झोन कडे पाठविण्यात आले. एम.एम.सी. मध्ये येवून सुरुवातीला त्याने दलम सदस्य म्हणून सन 2015 ते 2016 पर्यंत तांडा दलम व सन 2016 ते 2017 पर्यंत मलाजखंड दलम मध्ये काम केले.त्यादरम्यान मलाजखंड एरीया चा डि.व्ही.सी.एम. चंदु ऊर्फ देवचंद याचा अंगरक्षक म्हणून काम केले.सन- 2018 मध्ये त्यास परत दक्षीण बस्तर एरीया मध्ये पाठविण्यात आले.सन 2018 ते सप्टेंबर 2019 पर्यंत (माओवादी संघटना सोडण्यापर्यंत) त्याने पामेड प्लाटून क्रं. 9 मध्ये प्लाटून दलम सदस्य म्हणून काम केले.

आत्मसमर्पीत माओवादी देवा हा सन 2014 ते 2019 नक्षल संघटनेत कार्यरत असतांना टिपागड फायरींग (जिल्हा गडचिरोली), झिलमिली काशीबहरा बकरकट्टा फायरींग (जि. राजनांदगाव, छ.ग.), झिलमिली / मलैदा फॉरेस्ट कर्मचारी यांना मारहाण व चौकी जाळपोळ (जि. राजनांदगाव, छ.ग.), हत्तीगुडा / घोडापाठ फायरींग (जि. राजनांदगाव, छ.ग.), किस्टाराम ब्लास्ट (जि. सुकमा, छ.ग.), पामेड फायरींग (जि. बिजापुर, छ.ग.) इ. गुन्हयात सहभागी असल्याची माहिती दिली आहे.

जिल्हा पोलीस प्रशासना तर्फे राबविण्यात येणारे प्रभावी नक्षल विरोधी अभियान व त्याबरोबरच शासनाच्या आत्मसमर्पण योजने अंतर्गत सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासंबंधाने केलेल्या आवाहनाला अनुसरुन हिंसेचा मार्ग सोडुन समाजाच्या मुळ प्रवाहात समाविष्ठ होवुन सन्मानाने जिवन जगण्यासाठी सन-2005 पासुन (आत्मसमर्पण योजना अंमलात आल्यापासुन) ते आजर्पत एकुण 23 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे

सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवुन त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कार्यवाही नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महासंचालक संदीप पाटील,नक्षल विरोधी अभियान गडचिरोली परिक्षेत्राचे उप महानिरिक्षक अंकीत गोयल,जिल्हाधिकारी प्रजित नायर,पोलीस अधिक्षक गोरख भामरे,अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.