गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अर्जुनी वनपरिक्षेत्रात रानडुकराची शिकार करून मास विक्री करणाऱ्या पाच पैकी तीन आरोपींना वन विभागाच्या पथकाने रविवार 29 डिसेंबर रोजी रंगेहाथ पकडले. दरम्यान दोन आरोपी फरार झाले असून अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना 12 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणी वन विभागाच्या पथकाने आरोपींकडून 1 भरमार बंदुक, 10 बारूद गोळा, दोन कासवाचे कवच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रानडुकराची शिकार करून मास विक्री होत असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र कार्यालय अर्जुनी मोरगावला मिळाली. या माहितीच्या आधारे चौकशी केली असता आरोपी सोनूसिंग शैलेंद्रसिंग टाक ( रा. सिंगलटोली, अर्जुनी मोरगाव) यांच्या घरी घटनेतील आरोपी शिकार केलेल्या रानडुक्कराचे 50 किलो मांस विक्री करताना दिसून आले. दरम्यान, घटनेची अधिक चौकशी केली असता आशिक उर्फ लक्ष्मण राजकुमार मेश्राम (रा. येरंडी देवी) यांच्या घरून एक भरमार बंदूक, 10 बारुद गोळे, कासवाचे दोन कवच व इतर हत्यार जप्त करण्यात आले आहेत.
यातील सोनूसिंग शैलेंद्रसिंग टाक व बिरुसिंग निर्मलसिंग टांक दोघेही रा. सिंगलटोली, अर्जुनी मोरगाव, हे फरार असून मांस घेणारे ग्राहक आरोपी होमेंद्र जिजराम राकडे व नरेश रामजी खोब्रागडे दोघेही रा. पिंपळगाव /खांबी तर शिकारीचे साहित्य मिळालेल्या आशिक उर्फ लक्ष्मण राजकुमार मेश्राम रा. येरंडी/देवी या पाचही आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कलम 2 (16), 9, 39, 44, 48,51 कलमान्वये वन गुन्हा जारी करण्यात आला आहे. घटनेचा तपास उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई, प्रकाष्ट निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी राजेंद्रसिंह बहुरे अर्जुनी मोरगाव करीत आहेत. दरम्यान तीन आरोपींना 12 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर ईतर दोन फरार आरोपींचा शोध वन विभागाकडून करण्यातयेत आहे.