नागपूर,दि.३०ः- पाच ते सहा हजार रुपयांच्या क्षुल्लक उधारीच्या रकमेसाठी मामाने आपल्या दोन भाच्यांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याने एका भाच्याचा घटनास्थळीच तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी चार वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची हृदयाचा थरकाप उडविणारी दुर्दैवी घटना घडली.तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांधीबागेतील काली माता मंदिरासमोर ही घटना घडली. रवी राठोड व दीपक राठोड असे मृतक भावांची नावे आहेत.तर मदनसिंग राठोड असे खुनाचा आरोपी असलेल्या मामाचे नाव आहे.
या नृशंस हत्याकांडामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था जागेवर नसल्याची परिसरातील नागरिकांची भावना झाली असून झाल्या प्रकाराने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मदनसिंग राठोड याने अभिषेक राठोड, सोनु राठोड या दोघांच्या मदतीने भाच्यांचा खून केला असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
तहसील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवी व दीपक राठोड हे सख्खे भाऊ आहेत. दोघेही हंसापुरी भागात राहत असून त्यांचा महालच्या परिसरात बांगड्या विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता.मामा मदनसिंग याचे हंसापुरी येथे बांगड्या विक्रीचे होलसेलचे दुकान आहे. दोघेही मामाकडून उधारीवर माल घेवून महाल भागात विकत होते. मागील काही दिवसांपासून त्यांचा आपला मामा मदनसिंग सोबत पैशाच्या व्यवहारातून वाद सुरू होता.तर हे दोघेही भाऊ उधरीचे पैसे देत नसल्यामुळे मामा त्यांच्या मागे पैशांचा तगादा लावत होता. रविवारी १२ वाजताच्या सुमारास मामाने गांधीबागेत भाचा रविवर ह्याला एकटा पाहून त्याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. मामाचा हा हल्ला पाहून आपल्या भावाला वाचविण्यासाठी दीपकने तिकडे धाव घेतली असता मामाने त्याच्यावरही चाकूने हल्ला केला. दीपकला गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले मात्र दीपकचाही पहाटे चार वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.
ह्या हल्ल्याची माहिती मिळताच तहसील पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. जखमी दिपकवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू करण्यात येत होता. पहाटे चार वाजताच्या सुमारास दीपकचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.