१३ लाखाच्या सागवान लाकडाची तस्करी करणार्या तीन आरोपींसह वाहन जप्त

0
922
सागवान लाकडाची तस्करी करणारे आरोपी वनविभागाच्या ताब्यात

गोंदिया,दि.०६ : सडक अर्जुनी वनविभागाच्या पथकाने आज 06 जानेवारी रोजी अवैध सागवान लाकडांची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर कारवाई करीत तब्बल 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा कोयलारी या परिसरातून नागपूरकडे जात असलेल्या बंद वाहनातून सागवान लाकडांची अवैध रित्या तस्करी होत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे यांना गुप्तहेराकंडून मिळाली.त्या माहितीच्या आधारे सदर वाहनाचा पाठलाग करून  राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील फुटाळा–सौंदड परिसरात अडविले.वाहन चारही बाजूने कुलूप बंद असल्याने त्यात नेमके आहे तरी काय हे कळायला अवघड होते. विशेष म्हणजे वाहन चालकाने वाहन उघडण्यास नकार दिल्याने वन विभगाच्या अधिकाऱ्यांनी सदर वाहन ताब्यात घेत वन विभागाच्या कार्यालयात आणून पंचासमक्ष त्याची तपासणी केली असता लाखो रुपये किमतीचे सागवान लाकूड आढळून आले.त्यामुळे सागवान लाकडाच्या तस्करीकरीता वापरण्यात आलेले महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिकअप वाहन क्र. एम.एच. 40 बी.जी. 3801 ज्यावर ओम लाॅजिस्टीक लिमिटेड लिहिलेले वाहन जप्त करण्यात आले. त्या वाहनातून 13 नग सागवान लाकूड जे 1.910 घनमिटर एवढे आहे.त्या लाकडासह वाहनाची अंदाजे किंमत 13 लाख रुपये असून मुद्देमालासह जप्त करुन 4 आरोपी विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेले सागवान लाकडे व वाहन

ज्या ४ जणांना त्याब्यात घेण्यात आले,त्यामध्ये जितेंद्र रमेश राऊत, वय 38 कळमेश्वर,गुणवंत धनराज फुन्ने, वय 40 रा. गुमथळा व अनुज अशोक भोयर, वय 22, रा. परसोडी सर्व राहणार ता. कळमेश्वर जि. नागपूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.तर चौथा आरोपी दिनेश भोंडे रा. शेंडा ता. सडक अर्जुनी हा फरार झालेला आहे. आज तिन्ही आरोपींना सडक अर्जुनी येथील न्यायालयासमोर हजर केले असता 3 दिवसाची वन कोठडी आरोपींना ठोठावण्यात आली आहे.फरार आरोपीचा शोध सुरू असून ४ था आरोपी मिळाल्यास सदर लाकडे कुठून आणण्यात आले व अजून किती जणांचा यात समावेश आहे याचा शोध लागणार आहे.

सदर कारवाई सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे, क्षेत्रसहाय्यक कु.व्ही.बी. रहिले,एस.के. पटले,वनरक्षक कु.व्ही.आर. ब्राम्हणकर,कु. शालु मेंढे,पि.एम. पटले,मुकेश चव्हान,पि.बि.हत्तीमारे,डी.डी. माहूरे,कु.टी.आर.भेलावे,वाहनचालक समीर बंसोड,विपुल शहारे, किशोर बडवाईक यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पकडलेल्या वाहनातील लाकडे डोंगरगाव डेपो येथे ट्रॅक्टरच्या माध्यमातून हलवण्यात आले.