उकणी कोळसा खाणीत वाघाचा कुजलेला मृतदेह; १२ नखे व दोन दात गायब

0
175
file photo

यवतमाळ : वणी तालुक्यातील उकणी येथील खुल्या कोळसा खाणीच्या मुख्य मार्गावर वाघ मृतावस्थेत आढळला. वाघाचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या वाघाचे दोन मुख्य दात आणि १२ नखे गायब असल्याने वाघाचा मृत्यू नैसर्गिक आहे की त्याची शिकार करण्यात आली, याचा शोध वनविभागाने सुरू केला आहे.
उकणी कोळसा खाण परिसरात बोअरवेलजवळील डीपीनजिक मंगळवारी तीन ते चार वर्षे वयाचा हा वाघ मृतावस्थेत आढळला. वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. या वाघाचा मृत्यू १२ ते १३ दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता वन अधिकाऱ्यांनी वर्तविली. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवाल अद्याप यायचा आहे. या अहवालानंतरच वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला की, त्याची शिकार करण्यात आली, ही बाब स्पष्ट होणार आहे. दरम्यान, बुधवारी वन विभागाची चमू तपासासाठी पुन्हा घटनास्थळी गेली.
वन अधिकारी विक्रांत खाडे, सहायक वन परिक्षेत्र अधिकारी आशीष देशमुख व पथकाने घटनास्थळी सखोल तपासणी केली. या वाघाला विजेचा धक्का लागल्याची शक्यता असल्याने, वन विभागाने तेथील रोहित्र व विजेच्या तारा जप्त केल्या. उकणी येथील अधिकारी, कामगार व वाघाला प्रथमदर्शनी मृतावस्थेत बघितलेल्या कामगाराचे बयान नोंदविले. या वाघाचा मृत्यू विजेचा धक्का लागल्याने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी, वाघाचे १२ नखे व जबड्यातील मुख्य दोन दात गायब करण्यात कुणाचा सहभाग आहे काय, याचाही आता वनविभागाकडून कसून तपास केला जात आहे.
वाघाचा मृत्यू नैसर्गिक असण्याचीच शक्यता वाटत आहे. आज शवविच्छेदन अहवाल येणार आहे. नखे आणि दात गायब असल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती सहायक वन परिक्षेत्र अधिकारी आशीष देशमुख यांनी दिली.