गोंदिया,दि.१८ : शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्याबाबतच्या बैठकीतील भांडणावरून मनात राग धरून जीवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कुऱ्हाडीने काठीने हातावर,मांडीवर मारून तक्रारकर्त्याला जखमी करणार्या बापलेकांना ५ वर्षाची शिक्षा व ५ हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.सदर प्रकरणात २०१७ मध्ये डुग्गीपार पोलिसात फिर्यादीच्या तक्रारीवरून खूनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्या प्रकरणाच्या निकालात सदर निर्णय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश ए.टी.वानखेडे यांनी १७ जानेवारीला दिला.
हा गुन्हा घटना दिनांक 27/06/2017 रोजी 08.00 वाजता सुमारास मौजा- हेटी- गिरोला येथे घडला असून यातील आरोपी सुरेश सदाशिव लांजेवार वय 58 व माणिक सुरेश लांजेवार 24 वर्षे, दोन्ही राहणार हेटी-गिरोला, तालुका सडक/अर्जुनी, जिल्हा- गोंदिया यांनी फिर्यादीचा भाऊ तुकाराम हगरू लांजेवार वय 65 यांना मारहाण केल्या प्रकरणी अपराध क्रमांक- 60/2017 कलम 307, 34 भा. दं. वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता, सदर गुन्ह्या न्यायालयीन खटला केस क्रं. 90/2017 प्रमाणे न्याय निवाडयाकरीता प्रकरण न्यायालयात सुरू होते.
जिल्हा न्यायालयात सदर खटल्याचे सुनावणीत पंच, साक्षीदारांचे बयान, सबळ साक्षीपुरावे, युक्तिवादानंतर १७ जानेवारी २०२५ रोजी सदर प्रकरणाचा न्यायनिवाडा करत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे, यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपी सुरेश सदाशिव लांजेवार व माणिक सुरेश लांजेवार यांना 5 वर्षाची शिक्षा व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर शिक्षा झालेल्या गुन्ह्याचा तपास स.पो.नि. विजय सांडभोर, पोलीस ठाणे डुगीपार यांनी केलेला असून न्यायालयात सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता पारधी यांनी बाजु मांडली, तर न्यायालयात पैरवीचे कामकाज पो.हवा सुनील मेश्राम यांनी पाहिले.