स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण जनतेत बळकटी येईल-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

0
31
*प्रधानमंत्र्यांचा लाभार्थ्यांशी संवाद
*जमिनीच्या सनदीचे वितरण
अमरावती, दि. 18 : स्वामित्व योजनेतून गावठानाच्या जमिनी मुळ मालकाच्या नावावर होणार आहे. यासाठी भूमी अभिलेख विभागाने मेहनत घेतली आहे. या योजनेतून ग्रामीण जनजीवनाला बळकटी मिळेल, असे मत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी व्यक्त केले.
जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय स्वामित्व योजनेतून सनद वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार प्रतापदादा अडसड, भूमी अभिलेखचे उपसंचालक डॉ. लालसिंग मिसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बयास, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी महेश शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले, स्वामीत्व योजनेमुळे एक चांगले काम झाले आहे. इंग्रजकाळात जमिनीचा सातबारा अस्तित्वात आला. त्यानंतर आता स्वामित्व योजनेमुळे गावठाणाची जमीन मालकी हक्काने मिळणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. यामुळे जमीनवर कुणालाही हक्क सांगता येणार नाही. त्यामुळे जमीन विषयक तंटे कमी होण्यास मदत मिळेल. नागरिकांच्या नावे जमीन असल्यामुळे त्यांना घर बांधणीसाठी बँकांचे कर्ज सहज उपलब्ध होतील. यापुढील टप्प्यात नागरी भागात ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात केलेल्या चांगल्या कामाप्रमाणे शहरी भागातही भूमी अभिलेखने कामे करावीत, असे आवाहन केले.
आमदार श्री. अडसड यांनी योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणावरील जनतेला होणार आहे. जमीन नावावर होणे ही अतिशय चांगली बाब आहे. नागरिकांच्या दृष्टीकोनातून महत्वाचे काम होत आहे. त्यामुळे त्यांच्या कामाला प्राधान्य देण्यात यावे. या योजनेत ग्रामीण भागातील अर्थकारण बदलविण्याची क्षमता असल्याने योजना राबविताना आलेल्या अडचणी सोडविण्यात याव्यात. यात आलेल्या त्रृटी प्राधान्याने दुरूस्त कराव्यात, असे सांगितले.
श्री. शिंदे यांनी प्रास्ताविकातून योजनेची माहिती तसेच होणाऱ्या लाभाबाबत माहिती दिली. श्री. बयास यांनी मनोगत व्यक्त केले. सुरवातीला योजनेबाबत चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी संजय धर्माळे, विद्या माहुरे, नंदू ठाकरे, प्रल्हाद चव्हाण, त्र्यंबक हांडे, गोविंद धवने, मनिष भटकर, लक्ष्मण शिरसाठ यांना प्रातिनिधीक स्वरूपात सनदीचे वितरण करण्यात आले.
प्रधानमंत्र्यांचा संवाद
यानिमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योजनेच्या लाभार्थ्यांशी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. महाराष्ट्रातील एकमेव नागपूर येथून रोशन पाटील यांच्याशी त्यांनी सुरवातीला मराठीतून संवाद साधला. त्यांनी श्री. पाटील यांच्याकडून स्वामित्व योजनेच्या लाभासह इतर योजनांचा लाभ घेतला असल्याबाबत विचारणा केली. श्री. पाटील यांनी स्वामित्व योजनेमुळे कर्जाचा प्रश्न मार्गी लागला. मिळालेल्या कर्जातून घर बांधणी आणि शेतीमध्ये सिंचनाची व्यवस्था केल्याचे सांगितले. यामुळे तीन पिके घेण्यात येत असून उत्पन्नात वाढ झाल्याचे सांगितले. तसेच उज्ज्वला योजना, किसान सन्मान निधी आदी योजनांचा लाभ घेतला असल्याचे सांगितले.
दरम्यान आज देशभरातील 65 लाख मालमत्ता सनदीचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेत गावठाणाची जमीन मूळ मालकाच्या नावावर होणार आहे. याची सनदही देण्यात येणार आहे. यामुळे जमीनीचा मालकी हक्काबाबत पारदर्शकता येणार आहे. परिणामी जमीनसंबंधी होणारे दाव्यात लक्षणीय घट होणार आहे. यासोबतच जमीनीवर बँकेचे कर्जही सहज मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागाला पुन्हा एकदा वैभव प्राप्त होणार आहे, अशी आशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.