गोंदिया :तालुक्यातील गंगाझरी पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या दांडेगाव जुनेवानी जंगल परिसरात असलेल्या पलास रिसॉर्ट येथे आपल्या मित्राच्या लग्न समारंभाच्या कार्यक्रम आटोपून तिरोडातील व्यापारी गौरव निनावे व त्यांच्या मित्र आकाश नंदरधने हे दोघेही रात्री १२:०० च्या सुमारास पलास रिसॉर्टमधून निघाले. पण सदर रिसॉर्ट हा जंगलमार्गे असल्यामुळे ते दोघेही रात्रीच्या सुमारास मार्ग विसरले.काही अंतरावरील जुनेवाणी या गावात दाखल झाल्यानंतर तिरोड्याला जाणारा मार्ग विचारण्याकरिता मध्यरात्री चौकात थांबले असताना तेथे मोटरसायकलवर आलेल्या तीन अज्ञात तरुणांना त्यांनी तिरोडा जाणारा मार्ग विचारले असता त्यांना गाडीच्या काच खाली करण्यास सांगून बंदुकीच्या धाक दाखवीत गौरव निनावे यांच्या डोक्याला बंदूक लावून जवळ असलेली रोख रक्कम व दागिने बळजबरी करून मागितले.
गौरव निनावे यांनी देण्यास नकार देण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एका तरुणांनी जवळ असलेल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला दरम्यान दोघांजवळ असलेले १८ हजार रुपये रोख व त्या दोघांच्या बोटात असलेल्या तीन सोन्याच्या अंगठ्या व गौरवच्या हातात असलेला चांदीच्या कडा असा एकूण दोन लाख २४ हजार ५०० रुपयांचे साहित्य व रोख लुटून नेले.
दरम्यान, या संदर्भातील माहिती पोलिसांना दिली तर घरी येऊन दोघांना जीवानिशी ठार करण्याची धमकीही अज्ञात दरोडेखोरांनी दिली. रोख रक्कम व साहित्य हिसकावल्यानंतर सदर तीनही दरोडेखोर मोटरसायकल वर बसून जंगलाच्या दिशेने पळ काढला. घटनेनंतर गौरव व आकाश यांनी मध्यरात्रीच आपल्या मित्र मंडळ व नातेवाईकांना सदर घटनेची माहिती दिली व सरळ गंगाझरी पोलीस ठाणे गाठून या संदर्भातील तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून बुधवारी सकाळच्या सुमारास या घटनेच्या तपासाकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर व गंगाझरीचे पोलीस निरीक्षक वर्मा आपल्या पथकासह तसेच तपासाकरिता श्वानपथकाला घेऊन जूनेवानी या गावातील घटनास्थळी पोहोचले.
सकाळी सदर पथक तपास करीत असताना त्यांना हवेत गोळीबार झालेल्या बंदुकीचा कव्हर मिळालेला आहे. याप्रकरणी सदर तीनही दरोडेखोरांचा कसून तपास गंगाझरी पोलीस, स्थानिक गुन्हे शाखाचे पथक तसेच श्वान पथकाच्या मदतीने केला जात आहे. गंगाझरी पोलिसांनी दरोडेखोरी करणाऱ्या तीन अज्ञात आरोपींविरुद्ध ३०९/४, ३५१/२ अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आलेले आहे.