अपघातातील जखमींच्या बचाव आणि मदतकार्यासाठी रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डाव्होसहून प्रशासनाच्या संपर्कात,मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी, प्रशासनाकडून वेगाने मदतकार्य– उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई, दि. 22 :- जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजिक रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. अपघाताची घटना कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली तसेच जखमी प्रवाशांना तातडीची मदत व वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. मंत्री गिरीश महाजन स्वत: घटनास्थळी पोहचले असून पोलिस अधिक्षकांसह जिल्हा यंत्रणा युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डाव्होस येथून जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांनी अपघाताची माहिती घेऊन प्रशासनाला मदतकार्यासंदर्भात आवश्यक निर्देश दिले आहेत. जिल्हा प्रशासन आणि रेल्वे यंत्रणा समन्वयातून बचाव आणि मदतकार्य करीत आहे. मदतकार्य रात्रीही सुरु राहणार आहे. त्यासाठी ग्लासकटर, फ्लडलाईट्सह आवश्यक यंत्रणा अपघातस्थळी पोहचली आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पाचोरानजीक (जि.जळगाव) एका अत्यंत दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनासोबत समन्वयाने काम करीत आहे. मृतांच्या वारसांना ५ लाखांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल- मुख्यमंत्री pic.twitter.com/95qoeIlbE0
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 22, 2025