गोंदिया : धानाची वाहतूक करणार्या ट्रकला अचानक आग लागली. या आगीत धानासह संपूर्ण ट्रक खाक झाला. ही घटना बुधवार, 29 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर देवरी तालुक्यातील भर्रेगाव फाटा परिसरात घडली. घटनेत चालकाच्या प्रसंगावधानाने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकसह धान जळून नुकसान झाले. धान खासगी व्यापार्याचे असल्याची माहिती आहे. देवरीकडून ट्रक क्रमांक एमएच 35 के 4750 ट्रकमध्ये धान भरून छत्तीसगड राज्यात जात असताना देवरी शहरापासून काही अंतरावरील भर्रेगाव फाटा परिसरात शॉटसर्कीट होऊन ट्रकला आग लागल्याचे सांगीतले जाते. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवले. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्याने ट्रकसह संपूर्ण धान जळून राख झाले. घटनेची माहिती मिळताच देवरी नगरपंचायतच्या अग्निशामक दलाने घटनास्थळ गाठून आग नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण ट्रक व धान जळालेला होता.