अर्जुनी/मोरगाव – तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री,भांडण तंटा,विनयभंग या संबंधाने सबंधित गुन्हेगारांवरती अनेक गुन्हे केशोरी पोलीसांत दाखल असुन केशोरी पोलीसांनी त्यांच्या विरुद्ध वारंवार प्रतिबंधात्मक कार्रवाई करून शुध्दा त्यांच्यात कोणतीही सुधारणा झाली नसल्याने सदर गुन्हेगारांच्या कृतीमुळे केशोरी परीसरातील सार्वजनिक शांतता,कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये म्हणून आरोपीं विरूद्ध केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांनी आरोपी अविनाश अर्जुन मेश्राम,रा.तुकुम/सायगाव,महेंद्र तिमाजी परचापी,रा.गवर्रा ,मुरारी जनार्धन कानेकर रा.गार्डणपुर अशा या तीनही आरोपींना गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार ( तडीपार ) करणे करिता कलम 56 (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये प्रस्ताव अर्जुनी/मोरगाव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे मंजुरीस्तव सादर केला होता.अर्जुनी/मोरगाव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वरुणकुमार सहारे यांच्या आदेशानुसार देवरी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी विहीत मुदतीत सदर हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून सदर गुन्हेगारास गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती.या अनुषंगाने अर्जुनी/मोरगाव उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे यांनी तीनही आरोपींना 01 महिन्या पर्यंतच्या कालावधी करीता गोंदिया जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात येत असल्याबाबतचे आदेश दिले आहेत.गोंदिया जिल्हा पोलीस व अर्जुनी/मोरगाव उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे यांनी केलेल्या हद्दपारच्या कार्रवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून केशोरी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी पोलीसांच्या केलेल्या कार्रवाई वरती समाधान व्यक्त करुन केशोरी पोलीसांचे कौतुक केले आहे.सदरची कार्रवाई जिल्हा पोलीस अधिक्षक गोरख भामरे,अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा,देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांनी केलेली आहे.