महागावमध्ये अतिक्रमण धारकांची घरे जमीनदोस्त – वंचित बहुजन आघाडी आक्रमक

0
59

महागाव : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महागाव येथे अतिक्रमण धारकांवर प्रशासनाने जेसीबी फिरवत घरे जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे अनेक गरीब कुटुंब उघड्यावर आले असून, संसार उघड्या आसमानाखाली पडला आहे. लहान मुले, वृद्ध, महिला रस्त्यावर बसून आक्रोश करताना दिसत आहेत. या अमानवीय कारवाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला धारेवर धरत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती पाहून त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. “अतिक्रमण हटवायचे होते, पण या गरीब कुटुंबांना राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था का केली नाही? त्यांच्यासाठी जेवणाची, राहण्याची सोय का केली नाही?” असे सवाल उपस्थित करत दोन्ही पदाधिकाऱ्यांनी बार्शीटाकळी तहसीलदारांना धारेवर धरले. प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने वंचित आघाडीने थेट तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले.

दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन महागाव येथील अतिक्रमण धारकांवरील कारवाई त्वरित थांबवावी आणि ज्यांची घरे पाडली गेली आहेत, त्या सर्व कुटुंबांना नियमांनुसार भूखंड आणि घरकुल मंजूर करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, ॲड. संतोष रहाटे, तालुकाध्यक्ष गोरसिंग राठोड, नईम भाई, गोबा सेट, सुनील शिरसाट, माजी युवक अध्यक्ष अमोल जामनिक, शुद्धोधन इंगळे, मिलिंद करवते, अजय अरकराव, जनार्दन गवई यांच्यासह कार्यकर्त्यांनी या संपूर्ण प्रकरणात पुढाकार घेतला असून, अतिक्रमण धारकांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.