वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी; तिघांना अटक

0
2917

गोंदिया,दि. १९ :  नागपूरचे दक्षता विभागाचे वनाधिकारी पी. जी. कोडापे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणार्‍या तिघांना जेरबंद करण्यात आले. विठ्ठल मंगरू सराटी (रा. दल्ली हलबीटोला,ता. सडक अर्जुनी), हरीश लक्ष्मण लांडगे (रा. मुंडीपार सडक ता. साकोली जि. भंडारा) व घनशाम शामराव ब्राम्हणकर (रा. पिपरी गोंडउमरी ता. सडक अर्जुनी (ह.मु. अर्जुनी मोरगांव) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायानयाने त्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी सुनावली. ही कारवाई बुधवारी ( ता. १९) येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात वनपथकाने केली.
गोंदिया जिल्ह्यातील वनांत वन्यप्राण्यांची संख्या कमालीने वाढली आहे. परिणामी येथे वन्य प्राणी शिकार व त्यांचे अवयव तस्करी करणारी टोळी सक्रीय आहे. दरम्यान वनविभागाला शहरात वन्य प्राण्यांच्या अवयवाची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या अनुषंगाने तस्करांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. या सापळ्यात आरोपी अलगत अडकले. यावेळी बनावट ग्राहक तयार करून आरोपींशी बोलणी करून येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात आरोपी विठ्ठल सराटी, हरीश लांडगे व घनशाम ब्राम्हणकर यांना ताब्यात घेतले. कोहमारा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात आणून विठल सराटीच्या अंग झडतीत वाघ व बिबटच्या २२ नग मिशा, दोन दात, खवले मांजराच्या खवले, एक देशी कट्टा हस्तगत करण्यात आला. गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यालयाने शुक्रवारपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक प्रमोदकुमार पंचभाई यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक एस. एम. डोंगरवार करीत आहेत.

ही कारवाई विभागीय वनाधिकारी पी. जी. कोडापे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपसंचालक पवन जेफ, सहायक वनसंरक्षक  एस. एम. डोंगरवार, वनपरिक्षेत्रधिकारी मिथुन तरोणे, रविकांत भगत, सी. बी. भडांगे, पी. एम. पझारे, क्षेत्रसहायक एस. के. पटले, सी. एस. डोरले, यु. पी. गोटाफोडे, वनरक्षक पी. बी. हत्तीमारे, पी. एम. पटले, एम. व्ही. चव्हाण, एच. एम. बागळकर, आय. पी. राऊत, डी. डी. लांजेवार, पी. व्ही. कांबळे, समीर बनसोड व वनकर्मचार्‍यांनी केली.