अमरावती -नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा येथील बस स्टँडच्या जवळ असलेले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यानी त्यातील रोकड काढून घेऊन फोडून जाळून टाकल्याची खळबळ जनक घटना काल रात्रीच्या दरम्यान घडली आहे.
चोरट्यानी काल रात्री एकांतात व अगदी शांत परिसरात बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम वर हल्लाबोल करीत त्यातील रोकड काढून घेतल्यावर मशिनची तोडफोड करत अक्षरशः ती ज्वलन शील पदार्थ टाकून पेटवून देण्यात आली आहे.मात्र हे सर्व करण्यापूर्वी त्याठिकाणी असलेल्या सी सी टी व्हि कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
आज सकाळी हा प्रकार येथून जाणाऱ्या काही लोकांच्या लक्षात आल्यावर स्थानिक पोलिसांना याची सूचना देण्यात आली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली.अमरावती येथील स्थानिक गुन्हे शाखेची टीम घटनास्थळी दाखल झाली असून चोरट्यांना पकडण्यासाठी विविध पथकाकडून शोध घेत तपास सुरु करण्यात आला आहे.