कल्लू यादव गोळीबार प्रकरणात आणखी सहा आरोपींना केली अटक

0
122

गोंदिया,दि.८: कल्लू यादव गोळीबार प्रकरणातील मास्टरमाइंड प्रशांत मेश्राम याला मंगळवारी (दि. ४) अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्याला रिमांडमध्ये घेतल्यानंतर चौकशीत आणखी सहा आरोपींची नावे त्याने घेतली.
याआधारे पोलिसांनी त्या सहा आरोपींना विविध ठिकाणांवरून अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. यातील चार आरोपी शहर व लगतच्या परिसरातील असून, दोघे मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट येथील आहेत. ११ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान माजी नगरसेवक लोकेश ऊर्फ कल्लू सुंदरलाल यादव (४२, यादव चौक, गोंदिया) यांना दोन अनोळखी आरोपींनी संगनमत करून बंदुकीने गोळी मारून ठार करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात तक्रारदार लक्की यादव (रा. बाराखोली, सिंधी कॉलनी) यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध शहर पोलिस ठाणे येथे भादंवि कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल असून, तपास सुरूच आहे. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच नऊ आरोपींना अटक केली. तर मंगळवारी (दि. ४) प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रशांत उत्तम मेश्राम (रा. भीमनगर) याला अटक करण्यात आली. त्याची पोलिस कोठडी घेऊन चौकशी केली असता, त्याने आणखी सहा साथीदारांची नावे घेतली. याआधारे पोलिसांनी त्या सहा आरोपींना अटक केली असून, आता या प्रकरणात आरोपींची संख्या १६ झाली आहे.
या सहा आरोपींना केली अटक
प्रशांत मेश्रामच्या माहितीवरून पोलिसांनी शुक्रवारी (दि. ७) निखिलेश ऊर्फ निगम प्रकाश मेश्राम (२४, रा. फुलचुरपेठ), हर्ष अभय गजभिये (२२, रा. बाजपेयी चौक), उत्तम दुलिचंद गेडाम (५०, रा. कुंभारटोली) यांना बुधवारी (दि. ५) तसेच आरोपी चेतेश ऊर्फ चेतू धनराज कटरे (३०, रा. फुलचूर पेठ, आयटीआयजवळ) यास गुरुवारी (दि. ६) वेगवेगळया ठिकाणांवरून कोम्बिंग ऑपरेशन राबवून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कुलदीप भादू खरवडे (४०, रा. मनझारा, जि. बालाघाट) आणि खिलेंद्र हिरासिंग धुर्वे (३६,रा. टेकाडी-शिरपूर, जि. बालाघाट) यांनी देशी बनावटीची पिस्टल पुरविल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सुद्धा शुक्रवारी (दि. ७) अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना सोमवारपर्यंत (दि. १०) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपींवर आहेत यापूर्वीचेही गुन्हे नोंद
पोलिसांनी अटक केलेल्या चेतेश कटरे याच्या घराची झडती घेतली असता, एक देशी बनावटीची पिस्टल (कट्टा) मिळून आली आहे. आरोपी चेतू कटरे याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असून, पिस्टल गुन्ह्यामध्ये रीतसर जप्त करण्यात आली आहे. तर आरोपी खिलेंद्र धुर्वे याच्यावर बालाघाट पोलिस ठाण्यात देशी बनावटीची पिस्टल पुरविल्याबाबत यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.
दोन पिस्टल व दोन मोटारसायकली जप्त
प्रशांत मेश्राम याला अटक झाल्यानंतर आता या प्रकरणाला आणखी वेगळे वळण आले असून, नवनवीन बाबी उघडकीस येत आहेत. तर या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत एकूण १६ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून देशी बनावटीच्या दोन पिस्टल व तीन काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. गुन्ह्याचा तपास ठाणेदार किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात सपोनि वैभव गेडाम करीत आहेत.