यवतमाळ : जिल्ह्यात होळी व रंगपंचमी हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. रंगपंचमी खेळून काही युवक मंडळी तलावात आंघोळ करण्यासाठी गेले होते. यामध्ये दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कळंब तालुक्यातील खोरद येथील तलावात शुक्रवारी सायंकाळी घडली.
पंकज अशोकराव झाडे (३५) रा. झाडगाव तालुका राळेगाव व जयवंत पंढरी धनफुले (२८) वर्ष रा. मार्डी ता. मारेगाव अशी मृतांची नावे आहेत. पोलीस स्टेशन कळंब हद्दीतील खोरद येथील पंकज झाडे, जयंत धनफुले यांच्यासह पवन वसंतराव घोटेकर रा. झाडगाव, प्रविण अरुण भोयर रा खोरद, सागर वसंतराव घोटेकर रा. झाडगाव हे पाच जण रंगपंचमी खेळून आंघोळ करण्यासाठी तलावाकडे गेले होते. त्यापैकी पोहता येत नसल्याने दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.या घटनेने तालुक्यात शोककळा पसरली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सर्वत्र होळी शांततेत पार पडली. मात्र या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.