गोंदिया, ता. 22 ः वाळू चोरीप्रकरणी टिप्परला पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयात घेऊन जात असताना वाटेत दोन वाळूमाफियांनी मुजोरी करत देवरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना आेढताण करीत धक्काबुक्की केली. झटापटीत त्यांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला दुखापत झाली. ही घटना बुधवारी (ता. १९) रात्री पावणे नऊ ते साडेनऊच्या सुमारास कट्टीपार येथे घडली. या घटनेतील दोन्ही आरोपींना आमगाव पोलिसांनी अटक केली आहे.
लोकचंद राजाराम मेश्राम (वय ३८, रा. सरकारटोला, ता. आमगाव) व आेम शामलाल गाैतम (वय ३६, रा. सुपलीपार, ता. आमगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
देवरीच्या उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी खासगी वाहनाने निघाल्या होत्या. दरम्यान, कट्टीपार येथे एमएच ३५/ ए. जे. २७७१ क्रमांकाचा टिप्पर थांबवून त्यांनी चालक लोकचंद मेश्राम याला टिप्परमधील वाळूच्या पास परवान्याबाबत विचारले. यावर त्याने योग्य उत्तर दिले नाही. त्यामुळे वाळूची चोरी करून चालक टिप्परने वाळू वाहतूक करीत असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यासाठी टिप्पर तहसील कार्यालयात घेऊन जाण्यास चालक लोकचंदला सांगितले. त्यानुसार, टिप्पर तहसील कार्यालयात घेऊन जात असतानाच एमएच ३५/ ए. डब्ल्यू. ०६३८ क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या आरोपी आेम गाैतम याने वाहन रस्त्यावर आडवे करून कारवाईत अडथळा निर्माण केला. इतकेच नव्हे, तर उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांच्याशी वाद घालून झटापट केली. यात त्यांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला दुखापत झाली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी कविता गायकवाड यांना आेढताण करून धक्काबुक्कीही केली. पुढे पाहून घेण्याचीदेखील धमकी दिली. या प्रकरणी आमगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार चाैधरी करीत आहेत.