नाशिक –जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात पंचायत समितीच्या अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या कामासाठी एका कंत्राटदाराने काही साहित्याचा पुरवठा केला होता.त्याकामासाठी त्याचे तब्बल दोन कोटी दहा लाख रुपयांचे बिल पंचायत समितीकडे “पेंडिंग” होते.ते लवकरात लवकर मार्गी लागावे आणि मिळावे म्हणून त्या कंत्राटदाराचा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा सुरूच होता.मात्र सुरगाणा पंचायत समितीचे बिडीओ यांना त्या कंत्राटदारांची “जराही दया” आलीच नाही.
अखेर ह्या कंत्राटदाराला कुणीतरी सल्ला दिला की “म्हैस पन्हावल्या शिवाय दूध देणारच नाही.” आणि त्याने ह्या सल्ल्यानुसार बिडीओला एकांतात गाठून सरळ सरळ कामाचे बोलणे केले.ह्या झालेल्या सकारात्मक चर्चेतून ह्या बिडीओने २ कोटी ३२ लाख ३० हजार २७ रुपयांच्या बिलासाठी २ लाख १० हजार रुपयांची “डिमांड” पुढे केली,आणि ह्या कंत्राटदाराने क्षणाचीही वाट न पाहता ती पूर्ण करण्याची तयारी दर्शविली.
ज्या बिडीओने गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड “मानसिक त्रास” दिला त्याची “भरपाई” व ह्या बिडीओला चांगलीच अद्दल घडविण्यासाठी कंत्राटदाराने तडक नाशिक येथील एसीबीचे कार्यालय गाठून आपली तक्रार नोंदविली. अधिकाऱ्यांनी ह्या तक्रारीची “सत्यता पडताळणी” देखील तितक्याच तत्परतेने करीत “हरामाच्या पैशांसाठी हपापलेल्या” ह्या बिडीओची “जत्रा” करण्यासाठी लगेच सापळा कारवाई देखील निश्चित केली.ठरल्या ठिकाणी आणि निश्चित वेळेवर दोन शासकीय पंचांसमक्ष अखेर ह्या बिडीओने तक्रारकर्त्या कंत्राटदाराकडून “मागेपुढे न पाहता” दोन लाख दहा हजार रुपये घेऊन ते आपल्या “खिशात दाबले”.नेमक्या ह्याच क्षणाची वाट पाहत “दम धरून बसलेल्या” एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुरगाणा पंचायत समितीच्या पैशांसाठी हपापलेल्या बीडिओ महेश गोकुळ पोतदारची “गचांडी” धरून त्याच्याकडून लाचेपोटी घेतलेले २ लाख १० हजार रुपये जप्त केले,आणि सकाळी ११ वाजता त्याची “वरात” पोलिस स्टेशनला नेवून त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.