गोंदिया, दि.28 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय गोंदिया मार्फत केंद्र शासनाची प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ग्रामीण व शहरी भागासाठी राबविण्यात येत आहे. सदर योजनेची माहिती जनसामान्यांपर्यंत व्हावी, तसेच ग्रामीण व शहरी भागात बेरोजगार युवक-युवतींना स्वत:चा रोजगार उभारुन स्वयंरोजगार निर्माण करता यावा या उद्देशाने विविध योजनांची माहिती होण्यासाठी 20 मार्च 2025 रोजी जन शिक्षण संस्थान, कन्हारटोली, गोंदिया येथे जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक नरेंद्र मडावी यांनी मेळाव्याचे अध्यक्षस्थान स्वीकारुन युवक-युवतींना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचे जितेंद्र चौव्हाण, आरसेटीचे प्रबंधक अब्दुल वसीम, एसबीआयचे हनुमान मौंदेकर, पंजाब नॅशनल बँकेचे निखिल राऊत यांनी सदर योजनेंतर्गत बँकेच्या अटी व नियमाबाबत माहिती दिली.
सदर मेळाव्यात जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सी.बी.देविपुत्र यांनी मंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना बाबत सविस्तर माहिती दिली. उद्योग पर्यवेक्षक ए.एस.चव्हाण यांनी मधमाशा पालन योजनेची माहिती उपस्थित बेरोजगार युवक-युवतींना दिली. जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहून मंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती घेतली.
सदर मेळाव्यास महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालयातील व्ही.एस.पेंदोर, व्ही.सी.कोचे उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगार उभारण्यासाठी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले.