गोरेगाव -महावितरणच्या तेढा उपविभागातंर्गत तालुक्यातील पठाणटोला ते पिपरटोला या मार्गावर असलेल्या विद्युत खांबावर दुरुस्तीच्या कामासाठी चढलेल्या खासगी वॉयरमनचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना (ता. १९) सकाळी ८.३० वाजता सुमारासची आहे. या घटनेचे एकच खळबळ उडाली. प्रेमसागर रमेश गावळ (३१) रा. नवाटोला/निंबा असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे.
सविस्तर असे की, नवाटोला येथील प्रेमसागर रमेश गावळ हा खासगी वॉयरमनचा काम करतो. शेतकरी असो की सर्वसामान्य नागरिकांच्या विद्युत विषयक कामांसाठी तो नेहमीच जात असे.(ता. १९) सकाळी ८.३० वाजता सुमारास पठाणटोला ते पिपरटोला या मार्गावर कृषी पंपासाठी पुरवठा करण्यात आलेल्या विज वाहिनीच्या खांबावरतो चढला होता. दरम्यान अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने तो विद्युत धक्कयाने खाली पडला. त्यातच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतक प्रेमसागर गावळ याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी गोरेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. या अपघाती घटनेला घेवून विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रेमसागर हा कुणाच्या म्हणण्यावरून विद्युत खांबावर चढला होता. बंद विद्युत पुरवठा कुणी सुरळीत केला. असे प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिस तपासाकडे लक्ष लागले आहे.
सदर युवकाचे महावितरणशी कसलेही संबध नव्हते. तो युवक खांबावर केव्हा व का चढला असावा? याची साधी माहिती नाही. घटनेनंतर माहिती मिळाली. या घटनेत सदर युवकाचा नाहक जीव गेला आहे, मात्र त्याला कुणीतरी कामानिमित्त खांबावर चढविले असावे, असाही संशय आहे. – अभियंता, तेढा उपविभाग





